बदलापूर शहरात दहीहंडी रद्द

बदलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात वउत्साहात साजरा केला जातआहे. मात्र बदलापूर शहरात झालेल्या दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर यंदा शहरातील सर्व दहीहंड्याचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बदलापुरातील एका शाळेत झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे बदलापूर शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांनी आयोजित केलेले दहीहंडी उत्सव रद्द केले आहेत. सामाजिक जाणिवेच्या भावनेतून हा निर्णय घेतला असल्याचे दहीहंडी आयोजकांनी म्हटले आहे.

तसेच बदलापूर साऊंड असोसिएशननेही या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आपल्या आज घेतलेल्या सर्व ऑर्डर्स रद्द करून शहरात कोठेही साऊंड सिस्टीम न वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आज सकाळपासूनच संपूर्ण बदलापूर शहरातील दहीहंडी उत्सव रद्द झाल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे.

दरवर्षी बदलापूर शहरात विविध राजकीय पक्षाकडून चौकाचौकात दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो. दहीहंडी फोडणाऱ्या मंडळाला लाखोंची बक्षीसे दिली जातात. त्याचबरोबर यंदा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बक्षीसे ठेवली जाण्याची शक्यता होती. यामुळे आयोजकांसह गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र दोन आठवड्यापूर्वी बदलापुरात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे सामाजिक भान ठेवत राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी दहीहंडी उत्सव रद्द केला आहे.

 

 

Protected Content