बापरे…! भादलीत सात बंद घरे फोडली; दागिन्यांसह रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भादली येथील मस्जिद रोड आणि राडे वाडा या परिसरातील एकुण सात घरे अज्ञात चोरट्यांनी फोडून लाखो रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भादली येथे मध्यरात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकुळ घातला आहे. एकाच गावातील सात बंद घरे फोडल्याने गावात खळबळ उडाली आहे. यात दोन दुकानांचा समावेश आहे. गावातील मस्जिद रोडवरील राहणारे राजेंद्र रमेश चौधरी, दिपक जनार्दन चौधरी आणि तुळशीदास श्रावण चौधरी, रडे वाडा येथील राहिवाशी रामचंद्र बाबुराव रडे, चिंधू वामन रडे यांची बंद घरे फोडून दागिन्यांसह रोकडचा मुद्देमाल लांबविला आहे. तर काशीनाथ सखारा रडे यांचे किरणा दुकान आणि योगेश हेमचंद्र झांबरे यांचे श्रीराम ॲग्रो ट्रेंडर्स हे दोन दुकानेही फोडून मुद्देमाल चोरून नेला आहे.

 

चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडण्यासाठी कटरचा वापर करण्यात आला आहे. कुलूप तोडून त्यांनी घराच्या दरवाजाच्या बाहेर ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे. यावेळी घरातील कपाटील सामान अस्तव्यस्त करण्यात आले होते. गावातील वस्ती ही दाटीवाटीची असतांना चोरी करतांना शेजारी राहणाऱ्या गावकऱ्यांना देखील समजले नाही.

 

तीन दुचाकीवर सहा चोरटे

दरम्यान, पहाटे रडे गल्लीत राहणाऱ्या एका महिलेला तीन दुचाकींवर सहा चोरटे जातांना दिसून आले होते. त्यावेळी गावात चोरी झाल्याचे लक्षात आले आहे. दरम्यान, नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचानामा करण्याचे काम सुरू केले आहे. यावेळी फिंगर प्रींट एक्सपर्ट टीम आणि डॉग स्कॉड पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू होते. त्याचप्रमाणे सीसीटीव्हीचा आधारे शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Protected Content