नवी दिल्ली वृत्तसंस्था । मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. शिवकुमार यांना मिळालेल्या जामिनाविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
ईडीने एक मोठी चुक केली. ईडीने या प्रकरणी माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांच्या प्रकरणात दाखल केलेली याचिकाच कॉपी पेस्ट केली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं या मुद्द्यावर लक्ष गेल्यानंतर त्यांनी ईडीची ही याचिका फेटाळून लावली.
न्यायमूर्ती आर.एफ.नरीमन आणि न्यायमूर्ती रविंद्र भट यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवरील सुनावणी पार पडली. दरम्यान, ईडीची ही चूक न्यायमूर्ती नरीमन यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत हे कॉपी पेस्टचे प्रकरण वाटत असल्याचं म्हटले आहे. ईडीने दाखल केलेल्या याचिकेत शिवकुमार हे माजी अर्थमंत्री आणि माजी गृहमंत्री असल्याचं नमूद केलं होतं.