पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । माझी वसुंधरा अभियानांतर्गत पहूर पेठ ग्रामपंचायतीतर्फे आज रविवारी सायकल रॅलीद्वारे प्रदुषण मुक्तीचा संदेश देत जनजागृती करण्यात आली.
पहूर पेठ गावाची महाराष्ट्र राज्य शासनाच्या माझी वसुंधरा या महत्त्वाकांक्षी अभियानात निवड झालेली असून गावकऱ्यांनी राज्यस्तरावर बक्षीस मिळविण्याचा निर्धार केला आहे .त्या अनुषंगाने शासकीय परिपत्रकानुसार विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
आज राष्ट्रसंत गाडगे महाराज मंदिरापासून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्रदूषण मुक्तीचा संदेश देत सायकल स्वारांनी जनजागृती केली. सरपंच नीताताई पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपसरपंच शामराव सावळे, ग्रामविकास अधिकारी डी .पी. टेमकर, संतोष बारी, उमेश पाटील सोनाळे, रविंद्र महाजन, माजी पंचायत समिती सभापती राजधर पांढरे, सरपंच पती रामेश्वर पाटील, गणेश मंडलिक, सुनिल लोढा, रूपेश लोढा, अमोल देशमुख, विजय मोरे, शरद नरवाडे यांच्यासह शालेय विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप झाला.