Home क्राईम सायबर भामट्यांकडून ‘डिजिटल अटक’चा बनाव ; वृध्दाकडून १८ लाखांची लूट !

सायबर भामट्यांकडून ‘डिजिटल अटक’चा बनाव ; वृध्दाकडून १८ लाखांची लूट !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस आणि कायदेशीर कारवाईची भीती दाखवून एका वृद्धाला तब्बल १८ लाख २१ हजार ८२७ रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील रहिवासी असलेले ७१ वर्षीय मनोहर वसंत चौधरी हे निवृत्त सरकारी कर्मचारी असून सध्या शेती करतात. १७ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान सायबर भामट्यांनी त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. भामट्यांनी ‘Data Protection Board of India’ कडून बोलत असल्याचे सांगून “राज मल्होत्रा” आणि “संदीप रॉय” (वरिष्ठ पोलीस अधिकारी) अशी बनावट नावे सांगून चौधरी यांच्याशी संपर्क साधला. संशयित आरोपींनी चौधरी यांच्या व्हॉट्सॲपवर संपर्क करून त्यांना सांगितले की, त्यांच्या नावे विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. इतकेच नाही तर, विश्वास बसवण्यासाठी भामट्यांनी पोलीस आणि न्यायालयाचे बनावट हुकूमनामा आणि अटक वॉरंट व्हॉट्सॲपवर पाठवले. “तुम्हाला या प्रकरणात अटक होऊ शकते,” अशी धमकी देऊन त्यांना ‘डिजिटल अटक’ (Digital Arrest) च्या छायेत ठेवले.

कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आणि प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी आरोपींनी चौधरी यांना पैसे भरण्यास भाग पाडले. घाबरलेल्या चौधरी यांनी आरोपींनी दिलेल्या बँक खात्यांवर RTGS आणि NEFT द्वारे वेळोवेळी एकूण १८ लाख २१ हजार ८२७ रुपये पाठवले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस स्टेशन गाठले. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound