भुसावळ प्रतिनिधी । ग्राहकाने सदैव जागृत राहून कायदा समजून घेतला पाहिजे, कायद्याच्या फायद्यासाठी प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे. न्याय व हक्काकरीता ग्राहकाने लढण्याची ताकद ठेवावी. जागृत ग्राहकांची गरज आहे. यासाठी बिल नेहमी पक्के घ्यावे, चलन नाकारणे हा राष्ट्रदोह आहे. असे आवाहन जेष्ठ साहित्यिक तथा जिल्हा ग्राहक परिषदेचे उपाध्यक्ष अ.फ. भालेराव यांनी केले. ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंधरवाडा समारोपप्रसंगी ग्राहक जनजागृतीच्या अनुषंगाने “ग्राहक मार्गदर्शक मेळाव्या”चे आयोजन दि.३१ डिसेंबर येथील रानातला महादेव मंदिर शिवशक्ति हुडको कॉलनी जामनेर रोड येथे करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख वक्ते जिल्हा उपाध्यक्ष अ.भा. ग्राहक पंचायत जळगाव जिल्हा तथा जिल्हा ग्राहक पंचायत संरक्षण परिषदेचे सदस्य व जेष्ठ साहित्यिक भालेराव यांनी सांगितले की, वस्तूंमधील भेसळ कशी ओळखावी, यावर अतिशय मार्मिक कथा व काव्य सादर करून मार्गदर्शन केले. जर चुकुन ग्राहकांची फसवणूक झालीच तर त्यांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी ग्राहक मंचाने मार्ग दाखवावा, आजच्या युगात उत्पादकापासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्व स्वार्थी झाले आहेत. स्वार्थी वृत्ती ही ज्या दिवशी संपेल, तेव्हा खऱ्या अर्थाने ग्राहक राजा होईल. असेही अ.फ. भालेराव यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.
व्यासपीठावर उपस्थिती
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्य ग्राहक संरक्षण परिषद मंत्रालय मुंबईचे सदस्य विकास महाजन हे होते. तसेच यावेळी व्यासपीठावर भुसावळ पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे, अ. भा. ग्राहक पंचायत अध्यक्ष ॲड. कल्पना टेमाणी, सचिव ॲड जास्वंदी भंडारी, उपाध्यक्ष राजेश सैनी, कोषाध्यक्ष टेमाणी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीप्रप्रज्वलन करण्यात आले होते.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
यावेळी भुसावळ नगरपालिका मुख्याधिकारी करूणा डहाळे यांनी आपल्या मनोगतात भुसावळ ग्राहक पंचायतीने अल्प काळात ग्राहक जागृतीच्या क्षेत्रातील केलेल्या कार्याचे कौतुक केले. विकास महाजन यांनी अध्यक्षीय भाषणात भुसावळ तालुका ग्राहक मार्गदर्शन केंद्राचा लाभ घ्यावा तसेच ग्राहकांनी जागरूक व्हावे, असे आवाहन त्यांनी ग्राहकांना केले. अ.भा.ग्राहक पंचायत भुसावळ तालुका अध्यक्षा ॲड. कल्पना टेमाणी यांनी ग्राहक न्याय कुठे व कोणत्या प्रकारे मागु शकता याविषयी माहिती दिली.
रहिवाशींची मोठ्या संख्येने उपस्थिती
कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन सचिव ॲड जास्वंदी भंडारी यांनी केले. भुसावळ येथे ग्राहक मार्गदर्शन केंद्र सुरू केल्याबद्दल माहिती दिली तर आभार प्रदर्शन तालुका संघटक पत्रकार उज्वल बागुल यांनी केले. कार्यक्रमाला हुडको परिसरातील सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांनी केले परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भुसावळ ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष राजेश सैनी, कोषाध्यक्ष घनश्याम टेमानी, ॲड निलेश भंडारी, तालुका सहसंघटक हर्षल गोराडकर, सदस्य आदेश सांगळे, राजश्री नेवे, अनमोल टेमाणी, सुनिता राणे, नेहा यावलकर, ॲड पांडव, ब-हाटे, हुडको कॉलनीवासी प्रदीप बावस्कर, पितांबर पाटील, अतुल गुरव, किर्ती देवकर, स्वाती श्रींगोंदेकर, संगिता कुलकर्णी, वैशाली एकलारकर आदींनी सहकार्य केले.