शेगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संत नगरी शेगावमध्ये आगामी नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण रंगात आले असून, प्रत्येक गल्लीबोळात आता राजकीय चर्चांची लगबग सुरू झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीची घोषणा होताच सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार सक्रिय झाले आहेत. शेगावच्या राजकारणात कोण बाजी मारणार आणि नगराध्यक्षपदाचा ताज कोणाच्या डोक्यावर जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदा नगराध्यक्षपद हे पुरुष आरक्षित असल्याने युवा नेतृत्वात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस आणि शिवसेना यांसह स्थानिक आघाड्यांतील नेते कार्यकर्ते रणांगणात उतरले असून, इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरात उत्सुकतेचे वातावरण असून, प्रत्येक मतदार आपल्या भागातील उमेदवारांचे गुणदोष तपासत आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवरच निकाल ठरणार आहे. शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव या मुद्द्यांवर मतदारांचा कल अवलंबून राहील. त्याचबरोबर उमेदवारांचा स्वभाव, वागणूक, जनसंपर्क आणि आतापर्यंतची कामगिरीही मतदारांच्या निर्णयात महत्त्वाची ठरणार आहे.
शेगाव नगरपरिषदेत एकूण १५ प्रभाग असून, सुमारे ३० उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्षाने आपापल्या रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी बंडखोरीचे वारेही वाहत असल्याने शेगावची निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे. मतदारसंघात नेत्यांच्या प्रचार यात्रांना गती मिळाली असून, सोशल मीडियावरूनही उमेदवार आपला प्रचार जोरात करत आहेत.
तीन तारखेला मतदान होणार असून, निकालाच्या दिवशी संतनगरीतील सर्वांचे डोळे मतमोजणीकडे खिळले असतील. कोण उधळणार विजयाचा गुलाल आणि कोण राहणार एक पाऊल मागे, हे पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता शेगावकडे लागले आहे.
एकूणच, संतनगरी शेगावमध्ये राजकीय वातावरण तापले असून, स्थानिक मुद्द्यांसह प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेली ही निवडणूक कोणाच्या बाजूने कलते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



