दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून क्रूझर चालकाला बेदम मारहाण


यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात वाहन चालवण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका क्रूझर वाहन चालकाला दोन अज्ञात व्यक्तींनी शिवीगाळ करत बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी क्रूझर चालकाच्या डोक्यात वीट फेकून मारली, तसेच वाहनाचेही मोठे नुकसान केले. याप्रकरणी रविवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दोन हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल येथे राहणारे महेंद्र विठ्ठल बारी (वय ३७) हे आपल्या एम एच १९ बीजे ५०८९ क्रमांकाच्या क्रूझर वाहनाने शनिवारी सायंकाळच्या सुमारास शहरातील मटन मार्केट परिसरातून जात होते. त्याच वेळी त्यांच्या क्रूझर वाहनाचा रस्त्यावरील एका दुचाकीला किरकोळ धक्का लागला.

या क्षुल्लक कारणावरून दुचाकीवर असलेले दोन अज्ञात इसम संतप्त झाले. त्यांनी त्वरित क्रूझर चालक महेंद्र बारी यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली आणि शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना, त्यातील एका हल्लेखोराने रस्त्यावर पडलेली वीट उचलून थेट महेंद्र बारी यांच्या डोक्यात आणि क्रूझर वाहनावर फेकून मारली. या हल्ल्यात महेंद्र बारी यांना गंभीर दुखापत झाली, तसेच त्यांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले.

या घटनेमुळे मटन मार्केट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर हल्लेखोर तत्काळ घटनास्थळावरून पसार झाले. महेंद्र बारी यांनी स्वतःला सावरत या घटनेची माहिती यावल पोलिसांना दिली. बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दोन आरोपींविरोधात मारहाण, शिवीगाळ आणि वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत असून, पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.