भुसावळ प्रतिनिधी । श्रावण महिन्यातील आज दि. 26 ऑगस्ट रोजी शेवटचा सोमवार आहे. याचनिमित्ताने महाराष्ट्र सीमेलगत असलेले मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील शिरवेल येथील स्वयंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र गुजरातसह देशभरातील असंख्य भाविक येत असतात.
याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या 22 किलोमीटर असलेल्या मध्यप्रदेशातल्या खरगोन जिल्ह्यातील शिरवेल येथील महादेव संस्थान आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले शिरवेल महादेवाचे मंदिर महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात येथील पर्यटक व शिवभक्तांसाठी विशेष आकर्षण आहे. सातपुड्याच्या पर्वत रांगातून नयनरम्य असलेल्या परिसर पर्यटकांचे व भाविकांचे डोळ्यांचे पारणे फेडण्यासाठी सज्ज आहे. पर्वतरांगांनी हिरवागार शालू परिधान केलेला असून सतत कोसळत असलेल्या धबधबामुळे पर्यटक व शिवभक्त यानिसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत असतात. महाराष्ट्रभरातून येणारा भाविकांची संख्या या ठिकाणी अधिक असते. तसेच मध्यप्रदेश गुजरात या राज्यातील ही अनेक भाविक व पर्यटक याठिकाणी येतात. शिरवेल महादेव येथे जाण्यासाठी सातपुड्याच्या पर्वतरांगेतून अतिशय खडतर प्रवास करून जावे लागते. पर्वत रांगांच्या मध्यवस्तीत वसलेले व आदीवासी बहुल भागात हे स्थान आहे. इथल्या मनमोहक व नयनरम्य असा परिसर भाविकांना व पर्यटकांना आकर्षित करतो.
शिरवेलची आख्यायिका पुराणाच्या मान्यतेनुसार याठिकाणी रावणाने शिवाची तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले होते. रावणाने आपले दहाशिर महादेवाला अर्पण केल्याची आख्यायिका आहे. त्यावरूनच या स्थानाचे नाव सिरवेल असे पडले असून येथे असलेली शिवलिंग ही स्वयंभू असल्याने याठिकाणी केले जाणारे नवस हे पूर्ण होतात. अशी भाविकांची श्रद्धा आहे. पहाडाच्या खालून अतिशय खडतर मार्गाने जाऊन पहाडातील साठ फूट वर असलेल्या गुंफेत स्वयंभू महादेवाचे शिवलिंग आहे. या परिसरातील सातपुड्याचा नयनरम्य असा परिसर डोळ्यांचे पारणे फेडणारा असल्याने येथे येणारा प्रत्येक जण निसर्गात रमत असतो.