
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून सुमारे १५ ते २० किलोमीटर अंतरावर असलेल्या अवचित हनुमान या जागृत देवस्थानात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेतले असून, परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक विधी पार पडले. विशेष म्हणजे, या ठिकाणी असलेल्या लोण्यापासून तयार केलेल्या सुमारे साडेआठ फूट उंचीच्या हनुमान मूर्तीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. स्थानिक आख्यायिकेनुसार, आजूबाजूच्या खेडेगावातील शेतकरी व भाविक आपल्या जनावरांनी भरपूर दूध द्यावे तसेच शेतीला भरभराट यावी, या इच्छेने अवचित हनुमानाला नवस बोलत असत. नवस पूर्ण झाल्यानंतर ते लोणी, दूध आणि दही अर्पण करत असत, आणि याच अर्पणातून जमा झालेल्या लोण्यापासून ही भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील तापमान सुमारे ४० ते ४२ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचत असतानाही या मूर्तीचे लोणी वितळत नाही, ही बाब भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. त्यामुळे या जागृत देवस्थानाविषयी भक्तांमध्ये प्रचंड श्रद्धा असून, दर मंगळवार आणि शनिवारी तसेच विशेष सणांच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
हनुमान जयंतीनिमित्त मंदिर २४ तास खुले ठेवण्यात आले होते. रात्री बारा वाजल्यानंतर पारंपरिक पद्धतीने लोणी लेपनाचा कार्यक्रम पार पडला. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. मंदिर प्रशासनाने योग्य नियोजन करून भाविकांना सुलभ दर्शनाची व्यवस्था केली होती.
यावेळी सामाजिक बांधिलकी जपत रेड प्लस ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. धार्मिक उत्सवाबरोबरच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची ही परंपरा स्तुत्य असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
मंदिराचे मुख्य पुजारी दीपक महाराज यांनी सांगितले की, अवचित हनुमान हे जागृत देवस्थान असून येथे नवस केल्यावर भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात, असा दृढ विश्वास आहे. अनेक भाविकांनी आपल्या अनुभवांद्वारे या श्रद्धेला पुष्टी दिली. भक्तांशी साधलेल्या संवादातून त्यांच्या श्रद्धा, अनुभव आणि या देवस्थानाविषयीचा विश्वास स्पष्टपणे जाणवत होता.



