भुसावळात इच्छुकांची भाऊगर्दी ; बहुरंगी लढत रंगणार !

bhusaval vartapatra

राजकीय वार्तापत्र : संतोष शेलोडे

भुसावळ| भुसावळ विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून यंदाच्या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी लढतीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे यावेळी या मतदार संघात बहुरंगी आखाडा रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

 

भाजपाचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांची ही तिसरी टर्म असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना मंत्रिपदही मिळाले होते. दुसऱ्या पंचवार्षिक मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश करून दुसऱ्यांदा आमदारकी मिळविली होती. शहर व ग्रामीण भागात त्यांनी भरीव कामे केली आहेत, मात्र शहरात नगरपरिषदेत सत्ता असतानाही त्यांच्या सहकाऱ्यांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. अमृत योजनेचे काम बंद पडले असून शहरातील प्रत्येक रस्त्याचे तीन-तेरा झाले आहेत. मात्र यंदाच्या बहुरंगी लढतीत त्यांचा मनमिळावू स्वभाव आणि सत्ताधारी पक्षाचे पाठबळ त्यांच्या पथ्‍यावर पडून ते चमकदार कामगिरी करू शकतात.

भाजपतर्फे नशिराबाद येथील रहिवासी व जळगाव पंचायत समितीच्या लेवा समाजातील सभापती यमुनाबाई दगडू रोटे यांनीही उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे. नशिराबाद भुसावळ विधानसभा मतदार संघात असतांना रोटे परिवाराची कै.खा.वाय.जी. महाजन यांचेशी जवळीक होटी. तसेच माजी आमदार दिलीप भोळे यांनाही त्यांनी साथ दिली होती. त्यापूर्वी ग्रा.पं. सदस्य म्हणून त्‍या निवडून आल्या होत्या. त्यांनीही पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील व जिल्हा संघटक किशोर काळकर यांची भेट घेऊन दावेदारी केली आहे. लक्ष्मण सोळंके हेसुद्धा सुरुवातीपासून पक्षाशी एकनिष्ठ आहेत. डॉ.राजेश मानवतकर व डॉ.मधु मानवतकर यांनीही जोरदार प्रयत्न चालवले आहेत, त्यांनीही भाजपाकडूनच उमेदवारी मागितली आहे.

वराडसीमच्‍या सरपंच गिताबाई प्रशांत खाचणे ह्या सुध्दा निवडणूक मैदानात उतरण्‍याच्‍या तयारीत आहेत. त्याचवेळी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे अभियंता संजय ब्राह्मणे यांनीही तयारी चालवली आहे. यापूर्वी त्यांनी एकदा शिवसेनेतर्फेही उमेदवारी करून नशीब आजमावले होते. रिपाई आठवले गटातर्फे रमेश मकासरे व राजू सूर्यवंशी हे दोन प्रबळ दावेदार आहेत. युतीच्या माध्यमातून ही जागा रिपाईला सुटली तर या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. त्यातही राजू सूर्यवंशी यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सतीश घुले यांना किंवा त्यांच्या पत्नीला तिकीट मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यांना माजी आमदार संतोष चौधरी यांचे पाठबळ असल्याने ते अनेकांचे गणित बिघडवू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पीपल्स रिपाईचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनीही आपला दावा ठोकला आहे. शिवसेनेतर्फे वरणगाव येथील निलेश सुरडकर हे ही इच्छुक असून आ. सावकारे यांचे ज्येष्ठ बंधू प्रमोद सावकारे किंवा त्यांच्या पत्नी पल्लवी सावकारे ह्यासुद्धा रिंगणात उतरण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. वंचित आघाडीकडून नगरसेवक रवी सपकाळे तर एखाद्या राजकीय पक्षाने तिकीट दिल्यास किंवा अपक्ष उमेदवार म्हणून राष्ट्रीय हॉकर्स सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष राजू सपकाळे हे सुद्धा जोमाने कामाला लागले आहेत. तर भालोद येथील जि.प. सदस्या नंदा सपकाळे यांचे पती दिलिप सपकाळे हे सुद्धा इच्छुक असून मुलाखत देवून आले आहेत. तिकीट मिळाल्यास भुसावळ मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

अनेक इच्छुक उमेदवारांची या मतदारसंघात मजबूत दावेदारी असल्याने निवडणूक बहुरंगी किंवा तिरंगी होईल, हे स्पष्ट आहे. काहीही झाले तरी निवडणुकीत अगदी काट्याची लढत होऊन अगदी कमी फरकाने एखादा उमेदवार बाजी मारणार हे नक्की. मतदार जनता नेमकी कशाला महत्व देते, व्यक्ती, पक्ष, कामे, जात-पात, गट-तट, प्रलोभन की आणखी एखादा वेगळाच मुद्दा प्रभावी ठरतो, यावर विजयाचे गणित बदलू शकते.

Protected Content