मुंबई प्रतिनिधी । शेतकऱ्यांना व्यवहार्य शेती करता येईल यादृष्टीने कृषी संजीवनी प्रकल्पातून काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिल्या. पिकांना हमी नव्हे तर हमखास भाव मिळावा असेही ते म्हणाले.
वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव अशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी संजीवनी प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक विकास रस्तोगी आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कृषी विभागातील योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल अशा पद्धतीनेन पीक उत्पादनाचे नियोजन करावे. राज्यातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल अशा प्रकारे योजना राबवल्या पाहिजेत त्याचबरोबर विभागवार पिकांचेदेखील नियोजन करून ज्या पिकांना बाजारपेठ आहे तेच पिकले पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
कृषी संजीवनी प्रकल्प योजनेतून शेतकऱ्यांचे सक्षमीकरण झाले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे स्मार्ट ग्राम प्रकल्पाचीदेखील या प्रकल्पास जोडणी करावी जेणेकरून शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार करता येईल. बाजारपेठ असलेल्या पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली
कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, या योजनेंतर्गत सहभागी गावातील 3800 गावांचा पाण्याचा ताळेबंद करण्यात आला आहे. त्यामुळे ते पीक पद्धतीत बदलासाठी उपयुक्त ठरू शकते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला कायमस्वरूपी सबळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लवकरच या योजनेच्या सहभागी गावातील 5000 सरपंचांसमवेत वेबिनार आयोजित करून त्यांना मुख्यमंत्री मार्गदर्शन करतील.
क्षेत्रीय स्तरावर शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याची मागणी राज्यमंत्री डॉ. कदम यांनी केली. यावेळी श्री. रस्तोगी यांनी सादरीकरण केले.