यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर आणि मुक्ताईनगरनंतर आता यावल तालुक्यातही जनसुविधा केंद्रांच्या माध्यमातून कोट्यवधींच्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तब्बल ₹16 कोटी 63 लाख 48 हजार 85 रुपयांची अफरातफर झाल्याचे उघड झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाला वेग आला आहे.
फिर्यादी भरत वामन वारे (वय 52) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यावल तालुक्यातील साकळी, निमगाव, मनवेल, भालोद, मोहाळे आणि यावल येथील विविध CSC केंद्र चालकांनी संगनमताने हा गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 80/2026 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 318(4) व 336(3) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, खरीप हंगाम 2025-26 साठी पीक विमा नोंदणी करताना संबंधित केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडून 7/12 उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुकसारखी महत्त्वाची कागदपत्रे घेतली. मात्र प्रत्यक्षात पीक नसलेल्या क्षेत्राचे खोटे दाखले तयार करून विमा रक्कम मिळवण्याचा मोठा कट रचण्यात आला.
या घोटाळ्यात सुमारे 2041 शेतकरी प्रभावित झाले असून 2284.9 हेक्टर क्षेत्र दाखवले असताना प्रत्यक्षात 2437.39 हेक्टर क्षेत्र दाखवून 1089.28 हेक्टर अतिरिक्त क्षेत्राची बनावट नोंद करण्यात आली. या खोट्या माहितीच्या आधारे शासनाची दिशाभूल करून कोट्यवधींचा अपहार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात संबंधित CSC केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींमध्ये साकळी, निमगाव, मनवेल, भालोद, मोहाळे आणि यावल येथील केंद्र संचालकांचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब येताच तात्काळ कारवाई करण्यात आली.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



