मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना मुंबईतील एका कार्यक्रमात वेगळ्याच परिस्थितीला सामोरे जावे लागले. मुंबईत शनिवारी नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट (एनजीएमए) च्या कार्यक्रमात त्यांनी आपले भाषण सुरू केले. भाषणात सरकारच्या एका निर्णयावर त्यांनी टीका केली. सरकारवर टीका करू नका, असे व्यासपीठावरील एका सदस्याकडून सांगण्यात आल्याने त्यांना आपले भाषण अर्ध्यावरच सोडावे लागले.
शनिवारी अमोल पालेकर ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’द्वारे आयोजित कार्यक्रमास संबोधित करत होते. सुप्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या भाषणादरम्यान पालेकर म्हणाले की, कशा पद्धतीने वर्तमान काळात आर्ट गॅलरींनी स्वतःचे स्वातंत्र्य गमावलंय. शिवाय, त्यांनी आर्ट गॅलरीच्या कामकाजाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यादरम्यान, पालेकरांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या एका सल्लागार समितीचा उल्लेख केला. या समितीमध्ये स्थानिक कलाकारांचे प्रतिनिधित्व असायचे. पण, आता या समितीला थेट संस्कृती मंत्रालयाच्या नियंत्रणांतर्गत आणले गेल्याचे पालेकरांनी कार्यक्रमात सांगितले. अमोल पालेकर यांचा अर्धवट भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एखादी व्यक्ती भाषण करीत असताना त्या व्यक्तीला मध्येच भाषण करण्यापासून कुणी थांबवते का? असा सवाल करीत अमोल पालेकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. अभिनेता अमोल पालेकर यांचे ‘चितचोर’, ‘घरौंदा’, ‘गोलमाल’, ‘मेरी बीवी की शादी’, ‘बातों-बातों मे’, ‘नरम-गरम’, ‘श्रीमान-श्रीमती’ यासारखे चित्रपट गाजलेले आहे. ‘गोलमाल’ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा ‘फिल्मफेयर पुरस्कार’ही मिळालेला आहे.