नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमुक दिवसात गोरे व्हा, अमुक दिवसात केस उगवा, पांढरे करा किंवा इतक्या दिवसात बॉडी बनवा, अशा जाहिराती आता बंद होणार आहेत. कारण औषधींच्या खोट्या जाहिराती केल्यास कंपनीवर आता फौजदारी खटला दाखल करण्यात येणार आहे. एवढेच नवे तर, कंपन्यांकडून मोठ्या दंडाची रक्कमही आकारली जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
काही फार्मा कंपन्या खोट्या जाहिरातींच्या साहाय्याने आपल्या औषधांचा प्रभाव आणि सुरक्षेबाबात खोटी माहिती देतात. यामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकारे खोट्या जाहिराती करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी खटला दाखल करणं, कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापकांना तुरूंगवास आणि अशा कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारण्याची शिफारस करण्यात येऊ शकते, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. समिती ड्रग्ज अँड कॉस्मॅटिक्स रूल्स, १९४५ च्या शेड्यूल ‘जे’ मध्ये सामिल करण्यात आलेल्या आजारांवरील जाहिराती देणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या विचारात आहे. यामध्ये अशा आजारांचा समावेश आहे जे आजार कोणतीही औषधं बरं करण्याचा किंवा रोखण्याचा दावा करू शकत नाही. यामध्ये कर्करोग, काही लैगिक आजार, वेळेपूर्वी केस सफेद होणे आणि पुन्हा तरूण दिसण्यासोबतच अन्य काही बाबींचा समावेश आहे. दरम्यान,सद्य स्थितीतील कायद्यांमध्ये बदल करण्याची शिफारस करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.