मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | केंद्रीय महिला, बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी पाहुणे असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात गोंधळ झाला. यात दोषी असलेल्या राष्ट्रवादीसह भाजपच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपची वाटचाल यावर आधारित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमामध्ये सोमवारी गोंधळ झाला. यावेळी निदर्शन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडेना मारहाण करणाऱ्या भस्मराज तीकोने, प्रमोद कोंढरे, मयूर गांधी या भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखला केला आहे
दरम्यान, कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने सभागृहात गोंधळ झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या महिलांना भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला. यावरून भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलीस ठाण्यात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजपाच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणे ही अतिशय आक्षेपार्ह बाब आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध जी कारवाई करायची असेल ती होईल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चूक असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, याबाबत पोलीस आयुक्त निर्णय घेणार असून जे लोक दोषी असतील तर त्याच्यावरही कारवाई होईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे