बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील नांदगाव शिवारातील शेतातून ११ जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी निळ्या रंगाची ट्रॉलीचोरीला गेली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन जणांना अटक केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल राजाराम पाचपोळ यांच्या बोदवड तालुक्यातील नांदगाव शिवारातील शेतात ट्रॅक्टरीची ट्रॉली (क्रमांक एमएच १९ पी ९७८७) पार्कींगला लावलेली होती. ही ट्रॉली चोरट्यांनी ११ जानेवारी रोजी मध्यरात्री स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९ एएन ४१४७) मदतीने ट्रॉलीची चोरी केली होती. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या माहितीनुसार, विनोद उर्फ स्वामी रवींद्र कोळी (रा. भोरटेक, ता. यावल), विनोद उर्फ दशरथ गोपाल कोळी आणि वैभव उर्फचाळीस हेमंत कोळी (दोघे रा. पाडळसे, ता. यावल) यांनी ही चोरी केली असल्याचे समोर आले. त्यानुसार, १२ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरलेली ट्रॉली, गुन्हा करतेवेळी वापरलेले स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर आणि होंडा शाइन कंपनीची मोटारसायकल (क्रमांक एमएच १९ डीके ७१९९) असा एकूण ४ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, विष्णू बिऱ्हाडे, हरीलाल पाटील, विजय पाटील, ईश्वर पाटील, प्रदीप चवरे आणि चालक प्रमोद ठाकूर यांनी केली. संशयित आरोपींना त्यांना बोदवड पोलीस स्टेशनमध्ये पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले आहे.