मुंबई । ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असून क्रिकेटपटू व कलावंतांच्या पत्नीदेखील याच्या विळख्यात असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट अभिनेत्री शर्लीन चोप्रा हिने केल्याने खळबळ उडाली आहे.
अभिनेत्री शर्लीन चोप्रा हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. या मुलाखतीत शर्लिनने शाहरुख खानसह अभिनेत्री दीपिका पदुकोण, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि क्वान कंपनीच्या मालकावरही आरोप केले. तिने सांगितले की, मी ‘केकेआर’च्या (कोलकाता नाईट रायडर्स) सामन्यासाठी कोलकाता येथे गेले होते.
केकेआरने ईडन गार्डन स्टेडियममध्ये झालेला सामना जिंकल्यानंतर कोलकात्यामध्ये एका पार्टीचे आयोजन केले होते. अली मुरानी यांनी बोलवलेल्या या पार्टीमध्ये क्रिकेटपटू, फिल्म स्टार्स, त्यांच्या प्रेयसी, पत्नी असे अनेकजण हजर होते. प्रत्येकजण वेगवेगळ्या अमली पदार्थांचे सेवन करत होता. त्यानंतर फ्रेश होण्यासाठी शर्लिन पार्टी हॉलच्या बाथरूममध्ये गेली असता तिथे बॉलीवूड स्टार्सच्या पत्नी पांढरी पावडर सेवन करताना दिसल्याचे तिने सांगितले. इंडस्ट्रीत स्वतःच्या घरी मोठ्या पार्ट्या देणारे स्टार्स पार्ट्यांमध्ये फक्त अमली पदार्थांच्या व्हरायटी समोर ठेवतात आणि अमली पदार्थांचे सेवन न करणार्याची कशी टर उडवतात हे तिने सांगितले.
राम गोपाल वर्मा एक ड्रग अॅडिक्ट आहे, दीपिका पदुकोण चाहत्यांना, तरुणांना फसवत आहे. इंडस्ट्रीत कोणकोणत्या अमली पदार्थांची खरेदी कोण करतो, किती घेतो, कधी घेतो ही सगळी माहिती इनसाईडर्सना असल्याचे तिने उघड केले.