मुंबईत विश्वविजेत्या भारतीय संघाच्या मिरवणूकीला क्रिकेट चाहत्यांची अलोट गर्दी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्लीहून टीम इंडिया मुंबईत दाखल झाली आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर टीम इंडियाला मरीन ड्राईव्हवर नेण्यात येईल, जिथे विजयी परेड होणार आहे. मरीन ड्राईव्हवर लाखो चाहते आधीच उपस्थित आहेत. टीम इंडिया आज म्हणजेच ४ जुलै रोजी सकाळी ६ वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. या ठिकाणी पहाटे ४ वाजल्यापासून चाहते चॅम्पियन्स आणि ट्रॉफीची आतुरतेने वाट पाहत होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भारतीय संघ मुंबईसाठी रवाना झाला. टीम इंडिया दिल्लीहून विस्तारा एअरलाइन्सच्या खास विमानाने मुंबईत पोहोचली. या विमानाला खास नाव देण्यात आले. हे नाव रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जर्सीनंबर वरून देण्यात आले. रोहित आणि विराट आता टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. भारतीय संघ ज्या विमानातून प्रवास मुंबईत दाखल झाला, त्याला ‘UK1845’ असे नाव देण्यात आले. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे जर्सी नंबर अनुक्रमे ‘१८’ आणि ‘४५’ आहेत. भारतीय खेळाडूंसाठी आजचा खूप व्यस्त राहिला आहे. कारण सकाळी बार्बाडोसहून उतरल्यानंतर अवघ्या काही तासांनी संपूर्ण संघ पीएम मोदींच्या निवासस्थानी गेला, त्यांच्यासोबत नाश्ता केला आणि आता मुंबईत आला.

मुंबईत पोहोचल्यानंतरही भारतीय संघ खूप व्यस्त असणार आहे. विमानतळावरून संघाला त्या ठिकाणी नेले जाईल जिथून टीम इंडियाची विजयी परेड सुरू होईल. हा रोड शो मरीन ड्राईव्ह परिसरात होणार असून येथे ही टीम खुल्या बसमधून वानखेडे स्टेडियमवर पोहोचेल. यानंतर या मैदानावर एक खास कार्यक्रम होणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंमध्ये १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम वितरित करणार आहे.

Protected Content