जळगाव, लाईव्ह ट्रेंडस वृत्तसेवा । समाजातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट स्पर्धमहत्त्वाच्या ठरतात. अशा क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून समाजबांधव एकत्र येत असतात. एकमेकांशी संवाद घडून सामाजिक सौहार्द वृद्धीला लागते असे प्रतिपादन शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी केले. लेवा पाटीदार प्रीमियम लीग’ स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे सरदार वल्लभाई पटेल चषक सीजन थ्री अंतर्गत लेवा पाटीदार प्रीमियर लीग स्पर्धेचे २० ते २७ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर जयश्री महाजन, माजी महापौर तथा सभागृह नेते ललित कोल्हे, ब्रँड अँबेसेडर उद्योजक डॉ. के.सी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला प्रस्तावनेतून स्पर्धा आयोजन करण्यामागील उद्देश चंदन कोल्हे यांनी स्पष्ट केला. यानंतर देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, छत्रपती शिवाजी महाराज आणि खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी स्पर्धेचे उद्घाटन केले.
प्रसंगी बोलताना सुरेश भोळे यांनी सांगितले की, समाज हा एकत्र येणे गरजेचे आहे. सामाजिक सलोखा जपून ठेवण्यासाठी “लेवा पाटीदार प्रीमियम लीग” क्रिकेट स्पर्धा महत्त्वाची भूमिका बजावतील अशी आशा आमदार भोळे यांनी व्यक्त केली.
महापौर जयश्री महाजन यांनी, तरुण मुलांच्या आयुष्यात खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व असून निरोगी राहण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित होणे महत्त्वाचे आहे असे सांगत, लेवा पाटीदार प्रीमियर लीग स्पर्धेतील गुणवान खेळाडू भविष्यात देशासाठी खेळताना दिसतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माजी महापौर ललित कोल्हे यांनीदेखील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन स्वप्नील नेमाडे यांनी तर आभार अभिजित महाजन यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.