जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील यावल व रावेर या तालुक्यांसह चोपडा आणि बोदवड या तालुक्यातील पारंपरिक पाणीयोजना, बारव, विहिरी आणि विंधनविहीरी, बंधारे, तळे, ट्रेंच आदींची अद्यावत माहिती तयार करुन त्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्या.
केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जल शक्ती अभियान (JSA) राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जलसंधारण आणि पाऊसपाणी संकलन, पारंपरिक व इतर पाण्याच्या संरचनांचे नूतनीकरण, पाणलोट क्षेत्र विकास यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील यावल आणि रावेर तालुक्यात हे अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, पाल ता.रावेर येथे कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यावल, रावेर, चोपडा व बोदवड तालुक्यातील पाण्याच्या पातळीत झालेली घट याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस उपस्थित अधिकारी व जलसंधारणाच्या कार्यात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी सातपुडा विकास मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी, केंद्र शासनाच्या खाण मंत्रालयाच्या संचालक तथा अभियनाच्या समन्वयक श्रीमती फरीजा महेबुब नाईक, केंद्रीय जल व शक्ती संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस.एस.रोगटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील आदी उपस्थित होते.
अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कार्य करावे असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. जलसंवर्धनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून संयुक्तरित्या हे अभियान राबविले जाणार आहे. जलसंवर्धन आणि पाऊस पाणी संकलनाच्या दृष्टीने जिल्ह्यात सध्या झालेली कामे, त्यांची सद्यस्थिती, त्यावर करावयाच्या उपाययोजना आदींवर भर दिला जाणार आहे. पांरपारीक जलस्त्रोत, विहीरी, पाझर तलाव, तळे, ट्रेंच, छतावरील पाण्याचे संकलन आदी कामांवर अभियानात भर दिला जाणार आहे. या अभियानामुळे भविष्यात यावल व रावेर तालुक्यातील पाणी समस्या दूर होणार असल्याने, यामध्ये स्थानिकांना सहभागी करुन घ्यावे. शासनाकडून अनुदान मिळेल आणि त्यानंतर काम सुरु करण्याची पध्दत बदलून, अधिकाऱ्यांनी सध्या उपलब्ध असलेल्या स्त्रोतांचा वापर करुन कामे पूर्ण करण्याची सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
सातपुडा विकास मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी, अशाप्रकारच्या अभियानातून जलसंवर्धनाबाबत लोकजागृती करुन पुढील पिढीसाठी शाश्वत पाण्याची व्यवस्था निर्माण करावी असे सांगितले. अभियनाच्या समन्वयक श्रीमती फरीजा महेबुब नाईक यांनी अभियानाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करुन केंद्र सरकारकडून आवश्यक असणाऱ्या परवानग्या देण्याबाबत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
केंद्रीय जल व शक्ती संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस.एस.रोगटे यांनी अभियानाची एक जुलैपासून देशभरात सुरुवात झाली असून १५ सप्टेंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. कार्यशाळेत त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे अभियानाचा उद्देश व साध्य करावयाचे उद्दीष्ट याबद्दल माहिती दिली.
बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जळगांव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एल.एम.शिंदे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले, उपविभागीय कृषी अधिकारी बी.जी.व्यवहारे, यावलचे तहसीलदार जितेंद्र कुवर, रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे तसेच सर्व संबधित विभागाचे अधिकारी, जलसंधारणाचे कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरीक व शेतकरी उपस्थित होते.