भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकीकडे जग डिजिटल युगात प्रगती करत असताना, दुसरीकडे भडगाव तालुक्यात मात्र शेतकऱ्यांना आपले धान्य विकण्यासाठी भीषण संघर्ष करावा लागत आहे. भडगाव शेतकी संघाच्या भोंगळ कारभारामुळे ज्वारी खरेदीचे टोकन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना गेल्या २४ तासांपासून रांगा लावाव्या लागल्या आहेत. विशेष म्हणजे, या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.
सोमवार, ६ एप्रिलच्या रात्रीपासूनच तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघासमोर टोकन घेण्यासाठी गर्दी केली होती. मंगळवार दुपारपर्यंत भर उन्हात शेतकरी उभे असताना प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. पिण्याचे पाणी किंवा सावलीची सोय नसल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि तिथे मोठा गोंधळ निर्माण झाला.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी झालेल्या गोंधळात पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. वर्षभर शेतात राबून पीक पिकवणाऱ्या शेतकऱ्याला ते विकण्यासाठी आता पोलिसांचा मार खावा लागत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील शेतकऱ्यांनी दिली आहे.



