फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आपल्या भारतीय संस्कृतीत गायीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गाय आपल्याला विविध प्रकारचे पदार्थ आणि वस्तू प्रदान करत असते. गाईच्या शेणापासून सीएनजी गॅस यासह विविध उपयोगी पदार्थांची निर्मिती केली जात आहे. आपल्याला खऱ्या अर्थाने समरसता जोपासायची असेल आणि मानवजाती व जीवसृष्टीचे कल्याण करायचे असेल तर गाईचे पालन करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष परमपूज्य सप्तम कुबेराचार्य कैवल ज्ञानपीठाधीश्वर अविचलदासजी महाराज (सारसापुरी) यांनी केले.
वढोदे फैजपूर येथील निष्कलंक धाम येथे सुरू असलेल्या सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे आयोजित समरसता महाकुंभाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती महाराज, ज्ञानदेवसिंहजी महाराज, ज्ञानेश्वरदासजी महाराज, परमानंदजी महाराज, रामानंदाचार्य रामराजेश्वराचार्यजी महाराज, रवींद्रपुरीजी महाराज, कमलनयनदासजी महाराज, बालकानंदगिरीजी महाराज, धर्मदेवगिरीजी महाराज, राजेंद्रदासजी महाराज, जितेंद्रानंदजी महाराज, चैतन्य महाराज देगलुरकर, धर्मदेवजी महाराज, प्रसाद महाराज अमळनेर यांच्यासह शेकडो संत महंतांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
अविचलदासजी महाराज म्हणाले की, विविध संप्रदायांचे संत महंत एकाच व्यासपीठावर उपस्थित राहून समरस्यतेचा संदेश देत आहे, ही बाब राष्ट्राच्या हिताची आहे. या सर्व संतांना राष्ट्राची चिंता असल्यामुळे सर्व एकत्र आले आहेत. आपल्या हाताची पाच बोटे असूनही त्यांची वेगवेगळी नावे व कामे आहेत. परंतु एक साथ आले तर शत्रूचा मुकाबला करता येतो. म्हणून राजकारण्यांनी सुद्धा राष्ट्राच्या हिताची गोष्ट केली पाहिजे. सुरक्षा व औषधी यावर आपला सर्वात जास्त खर्च होत असल्यामुळे गरिबी येत आहे. त्यामुळे प्राकृतिक चिकित्सावर भर दिल्यास औषधीवरील बजेट बंद होईल. त्यामुळे गाय चिकित्सा करणे गरजेचे आहे. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांना अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्षपद आम्ही देवून आमची योग्य निवड असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवले असल्याचेही अविचलदासजी म्हणाले. पार्थ चौधरी यांनी केलेल्या पेंटिंगचे पोस्टर प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन श्री राधे राधे बाबा यांनी तर आभार अत्यंत भावुक होऊन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सर्वांचे हृदयस्पर्शी, हृदयपूर्वक आभार मानले. यावेळी सभामंडपात ग्रामविकासमंत्री ना. गिरीश महाजन, बऱ्हाणपूर मतदारसंघाचे खासदार, मध्यप्रदेशच्या माजी शिक्षणमंत्री अर्चना चिटणीस, आमदार शिरीष चौधरी, आमदार संजय सावकारे, आमदार राजू मामा भोळे उपस्थित होते. समर्थ महा कुंभाच्या तिसऱ्या दिवशीही हजारो भाविक उपस्थित होते. लाखो भाविकांनी ब्रह्मभोजनाचा लाभ घेतला पोलीस प्रशासन, महावितरण कंपनी, पार्किंगची व्यवस्था व आजूबाजूच्या ग्रामस्थांनी सहकार्य केले.
महामंडलेश्वर जनार्दन हरीजी तीन वेळा भावुक –
तीनदिवसीय समरसता महाकुंभात महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज ब्रह्मलीन गुरूवर्य जगन्नाथ महाराज यांचे स्मरण, आई-वडिलांचा त्याग व समर्पणाची भूमिका आणि महाकुंभात अहोरात्र सेवा देणारे स्वयंसेवक यांच्याविषयी बोलताना भावुक झाले व त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले.
महाकुंभात वैद्यकीय उपचारावर भर –
समरसता महाकुंभामध्ये संजीवनी ब्लड सेंटर फैजपूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 305 रक्तदात्यांनी रक्तदान करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपली सेवा दिली. समरसता महाकुंभामध्ये ग्रामीण भागातील जनतेसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले होते. त्यात गुजरात येथील डॉक्टरच्या टीमकडे 700 रूग्णांनी तपासणी करून औषधोपचार घेतले तर महाराष्ट्रीयन डॉक्टर टीम यांच्याकडे 1200 रूग्णांनी औषधोपचार घेतले. या महोत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड वॅक्सिनेशन शिबिराचेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 66 जणांनी लसीकरण करून घेतले.
महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज –
गायरान जमिनीवर मस्जिद अथवा मंदिर नाही तर गायींसाठी ती जमीन असावी, यासाठी पुढाकार घेण्याचे काम सध्या सुरू आहे. धरणगाव येथे गायरान जमिनीवर मस्जिद बनवण्यात येत होती. प्रशासनास निवेदन देऊन न्याय मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. मूक मोर्चा काढण्यात आला. भीतीपोटी कोणी यायला तयार नव्हते. भारताचा पुत्र म्हणून मी देशसेवेसाठी समर्पित आहे. गायरानची जमीन खाली होत नसेल तर अखिल भारतीय संत समितीचे 180 आखाडे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. गोहत्या बंद होऊन कत्तलखाने बंद करावे व त्यासंदर्भात कायदा करावा. गायींची तस्करी करणे बंद व्हावे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या गाड्या विनाकारण अडवल्या जातात. मात्र गाय भरलेली ट्रक अडवली जात नाही. गाय हा आमच्या श्रद्धेचा भाग आहे. मुंबई, नाशिक, पुणे विभागात कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना खूप त्रास होत आहे. मंत्री महोदय नामदार गिरीश महाजन यांनी बैठक आयोजित करून मुख्यमंत्री यांना भेटून समस्या दूर करावी असे आवाहनही जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. तसेच महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी शासन दरबारी काही मागण्या केल्या. अनधिकृत गोवंश वाहतूक बंद करावी, गोहत्या व कत्तलखाने बंद करावे, वर्षानुवर्षे गावोगावी असलेली गायरान जमीन ही मस्जिदच काय परंतु मंदिरासाठी पण कोणाला देऊ नये. ती फक्त आणि फक्त गायींसाठीच राखीव ठेवावी, असा कायदा शासनाने करावा, ही अखिल भारतीय संत समितीची मागणी त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
आचार्य संदेश श्रवणजी –
भारतात जेवणाबरोबर परमेश्वराचे मनन केले जाते. महिलांच्या अंगावर दागिने असतात. कपाळावर कुंकू असते आणि हे मस्तक चरणावर झुकलेले असते, हिच भारतीय परंपरा सर्वश्रेष्ठ असून हीच समरसता आहे.
दिव्यानंदजी महाराज –
संतांचे कार्य हे समरसतेचे असून महाभारत हे एक समरसतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी हा कुंभ आयोजित करून समरसतेचा छान सुंदर संदेश दिला आहे.
ईश्वरदासजी महाराज –
भारतात सर्व मंदिरांमध्ये सर्वांना प्रवेश मिळतो. सफाई कर्मचाऱ्यांनाही ध्वजाचे दर्शन करता येते. हीच आपली समरसता आहे. पृथ्वी, पाणी, सूर्य, गाय, माकड यांना आपण देव संबोधतो, ही देखील एक प्रकारे समरसताच आहे.
हरिचैतन्य महाराज –
सर्वत्र आत्मसमर्पण करणे म्हणजे समरसता आहे. सर्वात आधी ऋषीमुनींनी समरसता निर्माण केली. त्यानंतर वेगवेगळे पंथ विभागले गेले. त्यामुळे आपल्यापर्यंत समरसता पोहोचली नाही. सर्व संतांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्याचे अवघड कार्य जनार्दन महाराजांनी केले आहे. महानुभाव संतानी जे शब्दरूपी अमृत दिले आहे ते घेणाऱ्या व्यक्तींनी अवगत केले तर समरसता निर्माण होईल.
नरसिंहदासजी महाराज –
जेथे भक्ती, प्रेम, देवदर्शन, सद्गुरूंचा सहभाग असतो तिथे समरसता असते. महाकुंभात देवतुल्य महापुरूषांचे दर्शन व विचार ऐकायला मिळाले. गुरूकृपा ही आपला सन्मान आहे. जीवनाचे सार्थक करते. त्यामुळे भगवद्भक्ती होते. जनार्दन महाराजांचे आम्ही सर्व ऋणी आहोत. त्यासाठी आपण एक संकल्प करावा आणि प्रत्येक घरात अध्यात्म व प्रेमभक्ती करावी.
भक्ती किशोरदासजी महाराज –
जनार्दन हरीजी महाराज हे एक मोठे नम्र व्यक्तिमत्व आहे. संतांमध्ये समरसता आहे. देवता अनेक आहे मात्र भगवंत एक आहे. मार्ग वेगळे आहे, संस्कार वेगळे आहे, परंतु सर्वांचे ध्येय एकच आहे. सध्याची पिढी ही व्यसन व मोबाईलमुळे बरबाद होत आहे. त्यामुळे सर्वांना आवाहन की, संपत्ती बरोबरच धार्मिक संपत्तीपण पिढीला द्यावी. भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी संतांच्या माध्यमातून आपल्याला जावे लागेल. मुलांना धर्म, भक्ती शिकवा. त्यांना सांभाळा, व्यसनमुक्त करा, दगड मंदिरात गेल्यावर देव होतो, संतांच्या जवळ जाऊन देव नाही बनले तर माणूस तरी बनावे.
शरणदासजी महाराज –
आपल्या येणाऱ्या पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी आई-वडिलांनी प्रयत्न करावे. संतांनी मार्गदर्शन करावे. प्रत्येक ठिकाणी समरसतेची चर्चा व्हावी.
ज्ञानेश्वरदासजी महाराज –
सृष्टीचा पहिला समरसतेचा सुंदर उपदेश देणारे श्रीकृष्ण भगवान आहे. महादेवाच्या मंदिरात नंदी, कासव, सर्प, उंदीर, मोर हे एकमेकांचे शत्रू असूनही भेदभाव विसरून भगवंताच्या चरणी लीन असतात. हिंदू समाज विखुरलेला आहे, तो एकत्र होणे गरजेचे आहे. समान नागरी कायदा होणे गरजेचे आहे. सर्वांसाठी एकच कायदा असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे तर हे शक्य आहे. हीच एक अशी आहे की, त्यांनी समता व समरसता संदेश भारताला देऊन विश्वगुरू बनवावे. वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करण्यासाठी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.
सुरेश सदाशिव भैयाजी जोशी –
सामाजिक प्रश्नांसाठी असे कुंभ प्रत्येक वर्षी होणे गरजेचे आहे. भारतभूमी हा संत, ऋषीमुनींचा देश आहे. विश्वकल्याणासाठीची ताकद भारताजवळ आहे. भारत विश्वगुरू हे स्वप्न नाही तर संकल्प आहे. भारताला शक्तिशाली व सामर्थ्यसंपन्न बनवण्यासाठी सर्व तुकडे एकत्र होऊन भारत एकसंध व्हायला पाहिजे. भारत माता की जय ही घोषणा भारताला एक संघ बनवणार. भाषा भिन्न असूनही भाव एक आहे. आम्ही व्रत, यात्रा, धर्मग्रंथ, महापुरूष जातीचा विचार करत नाही तर आम्ही हिंदू आहोत असा विचार केला पाहिजे.
जगद्गुरु शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीला श्रद्धांजली अर्पण करतो. गाय हा सर्वांच्याच श्रद्धेचा विषय आहे. गायरान जमीन सोडवली ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाच्या घरात पूर्वी गाय पाळली जात होती. ती का बंद झाली? घरोघरी गाय असावी परंतु ती रस्त्यावर फिरत आहे. हे चित्र आपल्यासाठी शोकांतिका आहे. ज्या भूमीवर गायीचे रक्त सांडले जाते, त्या जमिनीची रक्षा भगवान कशी करेल? त्यामुळे गाईला पाळा, विचार करा आणि कार्यान्वित व्हा. शेतात युरिया टाकून विष पसरवले जात आहे. गायीचे शेण, मूत्रावर जमीन पडले तर ती जमीन सुपीक बनते. ट्रॅक्टरने जमीन तयार करण्याचे विपरीत परिणाम आपण पाहत आहोत. मातापित्याचे आपण रक्षण करू शकत नाही, त्यांना वृद्धाश्रमात का पाठवतो? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.