मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या दोन वर्षांपासून मानगुटीवर बसलेल्या कोविडच्या नियमांना आज पूर्णपणे उठविण्यात आले असून यात मास्कपासूनही मुक्ती मिळालेली आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे राज्यात खर्या अर्थाने अनलॉक करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारनं कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.राज्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आलेले आहेत. सर्वांनी आपले सण आनंदात साजरे करावेत. गुढीपाडवा, रमझान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इस्टर डे उत्साहात साजरा करावा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
त्याच बरोबर आता नागरिकांना मास्क पासूनही मुक्ती मिळाली आहे. मास्क ज्यांना वापरायचा असले त्यांनी वापरावा, त्याची सक्ती केली जाणार नसल्याचेही राज्य सरकारने म्हटले आहे. गुढीपाड्या निमित्त मिरवणूक काढण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपने केली होती. त्यानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. राज्यातील बहुतांशी लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. वेगाने लसीकरण झाल्याने कोरोनाचे संकट बऱ्याच अंशी कमी झाले आहे. त्यामुळे आता कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदाही मागे घेण्यात येणार आहे. मास्कचा वापर न केल्यास होणारी दंड आकारणीही रद्द होणार आहे.