पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी सजावट आणि आरास केली जाते, मात्र पाचोऱ्यातील एका न्यायालयीन कर्मचाऱ्याने आपल्या कलाप्रेमातून साईभक्तांसाठी खास आकर्षण ठरावी अशी देखणी कलाकृती साकारली आहे. गाडगेबाबा नगरातील रहिवासी आणि न्यायालयात कार्यरत असलेले संदीप बापूराव पाटील यांनी यंदा आपल्या घरगुती गणेशोत्सवासाठी थेट शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिराची १० फूट उंच हुबेहूब प्रतिकृती तयार केली असून, त्यांचं हे श्रमप्रेम व कौशल्य सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.
संदीप पाटील यांनी न्यायालयातील आपल्या नियमित नोकरीची जबाबदारी सांभाळत, वेळ काढून तब्बल १० ते ११ दिवस मेहनत घेऊन ही सुंदर प्रतिकृती तयार केली. पुठ्ठा, थर्माकोल, रंग आणि इतर साहित्य वापरून त्यांनी अत्यंत बारकाईने शिर्डीच्या साईमंदिराचा आकार आणि रचना उभी केली. गणेशमूर्तीच्या सजावटीसह साईबाबांची प्रतिमा, मंदिराची कमान, गाभारा आणि परिसराचा देखावाही त्यांनी सर्जनशीलतेने मांडला आहे.

घरगुती गणेशोत्सवाची क्रेज सध्या काहीशी कमी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र असे उत्सव हे फक्त पूजा किंवा मिरवणुकीपुरते मर्यादित न राहता, घराघरांतून आपल्या संस्कृतीचे जतन करणारे ठरावेत, ही संकल्पना त्यांनी या डेकोरेशनमधून मांडली आहे. घरगुती उत्सवातही कला, छंद आणि सर्जनशीलता जपली जावी, अशी त्यांची धारणा आहे.
गणेशोत्सव ही केवळ धार्मिक भावना नसून सांस्कृतिक समृद्धी जपण्याचे साधन आहे. संदीप पाटील यांचे हे कलाकृतीमधून प्रकटलेले योगदान घरगुती उत्सवाच्या परंपरेला नवे बळ देणारे ठरले आहे. स्थानिक नागरिक आणि पाहुणे या देखाव्याचे विशेष कौतुक करत असून, त्यांच्या कलाकृतीचे अनेकांनी फोटो आणि व्हिडिओद्वारे सोशल मीडियावरही प्रसारण केले आहे.
संपूर्ण डेकोरेशन त्यांनी घरच्या घरी तयार केले असून, कोणतीही बाह्य मदत न घेता केवळ छंद आणि श्रद्धेच्या बळावर साकारलेली ही साईबाबा मंदिराची प्रतिकृती गणेशोत्सवातील विशेष आकर्षण ठरत आहे.



