जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौफुलीवरील कालिंका माता मंदिरा जवळ एकाला चांदीचे व सोन्याचे बनावट दागिने दाखवून सुमारे ४ लाख २० हजार रुपयात फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा परिसरातील विश्वदिप कॉलनीत सुभाष रामदास लोखंडे हे वास्तव्यास आहे. ते मू.जे. महाविद्यालयात शिपाई म्हणून नोकरीस आहे. १३ जून रोजी ते पत्नीसोबत नवीन बी.जे. मार्केटमध्ये खरेदी करीत असतांना त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एक अनोळखी इसमाने त्यांना चांदीचे नाणे दाखविले. तसेच असेच ३५ नाणे माझ्याकडे असून ते विकत घेण्याबाबत त्याने लोखंडे यांना सांगितले. यावर लोखंडे यांनी हे नाणे चालत नसल्याचे सांगताच अज्ञात व्यक्तीने अजून काही नाणे खोदकाम करतांना सापडल्याचे लोखंडे यांना सांगितले. त्यानंतर दुसर्या दिवशी अज्ञात व्यक्तीने लोखंडे यांना सोन्याची माळ विकत घेण्यासाठी बोलविल्याने त्यांना विश्वास बसल्यामुळे लोखंडे यांनी त्या इसमाला त्यांचा मोबाईल क्रमांक दिला. दुसर्या दिवशी १४ जून रोजी सकाळच्या सुमारास त्या इसमाने लोखंडे यांना फोन करुन पांडे चौकाच्या पुढे येण्यास सांगितले. याठिकाणी दोन तरुण व एक महिला उभे होते. त्यांनी सुभाष लोखंडे यांना सोन्याचा एक मणी दिला त्या मण्याची तपासणी केली असता, तो खरा असल्याचे सराङ्गाने लोखंडे यांना सांगितले. १७ रोजी भेटण्यासाठी त्यांना अजिंठा चौफुलीजवळील संतोषी माता मदिराच्या रस्त्यावरील निर्जनस्थळी बोलविले.
याठिकाणी दोन अनोळखी इसमांनी सुभाष लोखंडे यांच्याकडून ४ लाख २० हजारांची रोकड घेवून त्यांच्याकडून आणखी भाड्यासाठी २०० रुपये देखील घेतले. आणि त्यांच्या हातात सोन्यासारख्या दिसणार्या पिवळ्या रंगाच्या दागिन्यांची पिशवी देत घरी जाण्यास सांगितले.
लोखंडे दागिन्यांची पिशवी घेवून घरी आले. त्यानंतर ते दागिन्यांची तपासणीसाठी ते सराफाकडे गेले असता त्यांना हे सर्व दागिने खोटे असल्याचे कळताच त्यांना त्या इसमाने आपली फसवणुक केल्याची समजले. त्यांनी मंगळवार 21 जून रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलिसात तीन अनोळखी पुरुषांसह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.