मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशाची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या भारतीय रेल्वेने आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलत, प्रवाशांच्या सुविधेत लक्षणीय भर घातली आहे. आता ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोख रकमेअभावी अडचणींना सामोरे जावे लागणार नाही, कारण आता रेल्वेने गाड्यांमध्येच एटीएम सेवा सुरू केली आहे. या अभिनव उपक्रमाची सुरुवात मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेसमधून करण्यात आली असून, ही देशातील पहिली ट्रेन ठरली आहे ज्यामध्ये एटीएम मशीन बसवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम मशीन बसवण्यात आले असून, प्रवाशांना प्रवासादरम्यानच रोख रक्कम काढण्याची सोय उपलब्ध झाली आहे.


मनमाड रेल्वे वर्कशॉपमध्ये खास डिझाइन करण्यात आलेल्या या एटीएमसाठी इलेक्ट्रिकल सपोर्टपासून ते स्ट्रक्चरल डिझाइनपर्यंत सर्व बाबींची विशेष काळजी घेतली गेली आहे. हाय-स्पीड ट्रेनमध्येही एटीएम नीट कार्यान्वित राहील याची खात्री करण्यात आली आहे. यासाठी एटीएमच्या सभोवती मजबूत शटर दरवाजा बसवून सुरक्षा यंत्रणाही उभारण्यात आली आहे.
यासंदर्भात रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “आज सकाळी ही ट्रेन एटीएम कोचसह मुंबईत पोहोचली आहे. हा एक अनोखा आणि उपयुक्त उपक्रम असून, आम्हाला विश्वास आहे की ही सेवा प्रवाशांसाठी अत्यंत उपयोगी ठरेल.” पंचवटी एक्सप्रेस ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते मनमाड जंक्शनया दरम्यान धावणारी एक सुपरफास्ट ट्रेन आहे. दररोज हजारो प्रवासी या ट्रेनने प्रवास करतात. मुंबईकरांसाठी ही ट्रेन म्हणजे एक प्रकारे जीवनवाहिनीच आहे. दररोज सकाळी व संध्याकाळी या ट्रेनची गर्दी पाहता, एटीएमसारखी सेवा प्रवाशांसाठी खरोखरच उपयुक्त ठरणार आहे.


