बंगळुरू-वृत्तसंस्था | कर्नाटक विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून प्राथमिक कलांनुसार भाजप व कॉंग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच होणार असल्याची चुणूक दिसून आली आहे.
कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान झाले होते. आज सकाळी आठ वाजेपासून याची मतमोजणी सुरू झाली आहे. यंदा सत्ताधारी भाजपला कॉंग्रेसने मोठे आव्हान उभे केले असून जेडीएसने देखील आपला बालेकिल्ला सांभाळण्यासाठी मोठी ताकद लावल्याचे दिसून आले. कडाक्याच्या उन्हाळ्यात तिन्ही पक्षांनी एकमेकांवर जोरदार टिकास्त्र सोडले. भाजपकडून थेट पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. तर कॉंग्रेसतर्फे राहूल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी सत्ताधार्यांना धारेवर धरले. निवडणुकीच्या प्रचारात बजरंगबलीचा मुद्दा गाजला. कॉंग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन आपल्या संकल्पपत्रात दिल्याने मोदींनी जय बजरंगचा नारा बुलंद करत मतदारांना मते मागितली. तर शेवटच्या टप्प्यात ‘द केरला स्टोरी’चा मुद्दा देखील खूप गाजला.
दिनांक १० मे रोजी झालेल्या मतदानानंतरच्या बहुतां एक्झीट पोल्समध्ये भाजप व कॉंग्रेसमध्ये जोरदार चुरस होणार असल्याचे दर्शविण्यात आले होते. या विशेष करून कॉंग्रेस जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता दिसून आली होती. आज सकाळी मतमोजणी सुरू होण्यापूर्वी दोन्ही पक्षांनी विजयाचे दावे केले होते. या पार्श्वभूमिवर, आज सकाळी आठ वाजता सर्वच्या सर्व २२४ जागांवर मतमोजणी सुरू झाली. यात पहिल्यांदा पोस्टल मते मोजण्यात येत आहेत. यात भाजप ५० तर कॉंग्रेस ५० ठिकाणी आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. अर्थात, या अतिशय प्राथमिक कल असून यात प्रत्यक्षातील इव्हीएमच्या मतमोजणीनंतर खर्या अर्थाने रंगत चढणार आहे.