धाकधूक वाढली : जळगाव व रावेर मतदारसंघांसाठी सुरू झाली मतमोजणी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज ब्युरो | १३ मे रोजी अतिशय चुरशीच्या झालेल्या जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाची मोजणी सुरू झाली असून यात कोण बाजी मारणार ? हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.

अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागा अर्थात जळगाव आणि रावेर मतदारसंघांमध्ये अनेक मनोरंजक टर्न आले. भारतीय जनता पक्षाने जळगावातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकिट कापून माजी आमदार स्मिताताई उदय वाघ यांना तिकिट दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तर दुसरीकडे रावेरमधून मात्र लागोपाठ तिसर्‍यांदा विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांच्यावर विश्‍वास टाकण्यात आला.

भारतीय जनता पक्षाने खूप आधी उमेदवारी जाहीर करून बाजी मारली असतांना पहिल्यांदा विरोधकांचा उमेदवार कोण असेल याबाबत सस्पेन्स निर्माण झाला. उन्मेष पाटील यांनी थेट समर्थकांसह शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश केला. तर त्यांच्या सोबत आलेले पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण बाळासाहेब पवार यांना पक्षाने जळगावातून उमेदवारी दिली. तर रावेरमधून जानेवारी महिन्यात भाजपमध्ये आलेले उद्योजक श्रीराम दयाराम पाटील यांनी शरद पवार गटात एंट्री केल्यावर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर, वंचित बहुजन आघाडीने रावेरमधून अभियंता संजय पंडित ब्राह्मणे यांना उमेदवारी जाहीर करून रिंगणात उतरवल्याने येथील मुकाबला हा तिरंगी आणि अर्थातच अधिक चुरशीचा बनला.

निवडणुकीच्या प्रचारात महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार टक्कर झाली. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. दोन्ही बाजूने मान्यवर नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. यामुळे आरंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात अतिशय चुरशीची बनली. यात जळगावसाठी ५७.७ टक्के तर रावेरमधून ६४.२७ टक्के मतदान करण्यात आल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. मतदान झाल्यावर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूच्या उमेदवारांनी विजयाचा दावा केला होता.

या अनुषंगाने आज मंगळवार दिनांक ४ जून २०२४ रोजी सकाळी आठ वाजेपासून जळगाव येथील राज्य वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी सुरू झालेली आहे. पहिल्या टप्प्यात टपाली आणि दिव्यांग तसेच वयोवृध्दांनी केलेल्या मतदानाची मोजणी करण्यात येणार असून नंतर विविध फेर्‍यांमधून मतमोजणी जाहीर करण्यात येणार आहे. यातील प्राथमिक कल हा काही तासात येणार असून दोन्ही मतदारसंघाचा निकाल हा दुपारी चार वाजेपर्यंत येईल असे अपेक्षित आहे. अर्थात, मतमोजणी सुरू झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये नक्कीच धाकधूक वाढली असेल हे निश्‍चीत !

Protected Content