चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील शुभम ट्रेडर्स येथे ‘टाटा नमक’ नावाने विकल्या जाणाऱ्या बनावट मालावर आय.पी. इन्वेस्टिगेशनच्या टीमने छापा टाकून सुमारे २० टन बनावट माल पकडला आहे.
पकडण्यात आलेल्या साठ्यात टाटा मिठाच्या ३९० गोण्या असून प्रत्येक गोणीत ५० पॅकेट याप्रमाणे १९,५०० पॅकेट जप्त करण्यात आले आहेत. यामालाची एकूण किंमत ३ लाख ९० हजार रुपये एवढी आहे. बनावट सदर कारवाई पोलीस निरीक्षक विवेक ठाकूरवाड, मुंबईच्या आय.पी. कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक मोहम्मद चौधरी, अनिल मोरे, अनुप कोलप, लक्ष्मण विश्वकर्मा तसेच शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली. मोहम्मद चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येथील शहर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बनावट मीठ विकले जात असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर हा बनावट साठा पकडण्यात आला आहे. शुभम ट्रेडर्स हे शहरातले सर्वात मोठे मिठाचे व्यापारी आहेत, या कारवाईने खळबळ उडाली आहे.