मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ईडीने राहूल गांधी यांच्यावर कारवाई केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे काऊंट डाऊन सुरू झाले असल्याचा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
आज लागोपाठ तिसर्या दिवशी ईडीने राहूल गांधी यांची चौकशी केल्यामुळे देशभरात कॉंग्रेस नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गांधी भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी नाना पटोले म्हणाले की, देशात अत्यंत भयानक परिस्थिती आहे. सुडाने पेटून उठलेल्या भारतीय जनता पार्टीचे सरकार दिल्लीत सत्याग्रहासाठी आलेले कॉंग्रेसचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार यांच्यावरही हल्ले करत आहे. दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयात घुसून तेथील नेत्यांनाही मारहाण करण्यात आली. इंग्रज सरकारपेक्षाही वाईट सरकार केंद्रात आहे पंरतु कॉंग्रेस पक्ष बलाढ्य अशा इंग्रज सत्तेला घाबरला नाही उलट त्यांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. तेव्हा ब्रिटिंशाविरोधात लढलो आता ब्रिटिशांच्या हस्तकांविरोधात लढत आहोत, आम्ही यांना घाबरत नाही. या कारवाईतून भाजपचे काऊंट डाऊन सुरू झाले असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
यावेळी विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. कुणाल पाटील, महिला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे आदी उपस्थित होते.