जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील योग मार्गदर्शन केंद्र, क्रीडा विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासी शिबीरात बुधवार २१ सप्टेंबर रोजी प्रात्यक्षिकांसह 300 विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर योग मार्गदर्शक केंद्राचे प्रमुख अभि. राजेश पाटील, समुपदेशन तज्ज्ञ डॉ.वीणा महाजन, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे, डॉ.लीना चौधरी उपस्थित होते. यावेळी बोलतांना श्री. पाटील म्हणाले की, शहरी वातावरण, बदललेली भाषा, विद्यापीठाचे भव्य वातावरण हे विद्यार्थ्यांसाठी नवीन असून भविष्यातील स्पर्धांना सामोरे जाण्याची भीती, व्यासपीठावर उभे राहण्याची भीती, स्वतःला व्यक्त करण्याची भीती या सर्व बाबींना हेरून या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता समुपदेशनाची गरज आहे. डॉ. वीणा महाजन यांनी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिकासह समुपदेशन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार योगशिक्षक कृणाल महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अश्विन सोनवणे, भगवान पाटील, रत्नाकर सोनार आदींचे सहकार्य लाभले.