यावल प्रतिनिधी | येथील नगरपालिकेने तयार केलेल्या साठवण तलावाच्या कामात तब्बल १ कोटी ८० लाख रूपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी येथील नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी यांनी केली असून याबाबत जिल्हाधिकार्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. थेट नगराध्यक्षांनीच तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, यावलच्या नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी यांनी आज जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन यावल नगरपालिकेच्या साठवण तलावात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. यात म्हटले आहे की, या कामाची निविदा ही ३ कोटी ५१ लाख रूपये इतक्या मूल्याची होती. यात अतिशय नियोजनबध्द रितीने सुमारे १ कोटी ८० लाख रूपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. या निविदेसाठी पाच पात्र कंत्राटदारांना बाद करून अनिल शामराव पाटील यांना ही निवीदा मिळवून देण्यात आली. निविदेत नमूद असलेल्या निकषांऐवजी कमी क्षमतेचे काम करून यात घोळ करण्यात आला आहे. यासाठी तत्कालीन सीओ, अभियंता आणि कंत्राटदारांची मिलीभगत आहे. यातील कंत्राटदारांमध्ये जळगावचा नगरसेवक आणि एक हवालदार तसेच यावलच्या एका नगरसेवकाचा समावेश असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
संबंधीत साठवण तलावाचे काम हे विहीत निविदेपेक्षा कमी प्रमाणात आणि अतिशय निकृष्ट पध्दतीत तयार करण्यात आलेले आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे भ्रष्टाचारासाठी बदनाम झाले होते. याचमुळे त्यांना अँटी करप्शनने अटक केल्याची बाब लक्षणीय आहे. यात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कंत्राटदार सहभागी असून त्यांची सखोल चौकशी करून संबंधीत रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. दोषीवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही निवेदनात केली आहे. नगरपालिकेच्या कामाच्या भ्रष्टाचाराची तक्रार खुद नगराध्यक्षांनी केल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी पूर्वीच्या साठवण तलावा लगतच नगरपालिकेने सुमारे दोन कोटी ८४ लाख रुपयाचा अतिरिक्त साठवण तलाव बांधला आहे.
या कामात संबंधित कंत्राटदार व अधिकार्यांनी सुमारे १ कोटी ८० लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप येथील नगराध्यक्ष तडवी यांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांचेकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. निवेदनात नियोजनबाह्य निविदा काढणे, साठवण तलावाची जागा न मोजता घाईघाईने कामास सुरुवात करणे, अंदाजपत्रकानुसार तसेच आराखड्यानुसार तलावाचे काम न करणे, कामात झालेल्या बदलाची वरीष्ठाकडून मंजुरी घ्यावी अशा सूचना असतानाही तलावाचा आराखडा कमी करून मोठ्या रकमेचा अपहार करणे सोयीचे जावे हे नियोजन बद्ध करण्यात पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी, अभियंता, कंत्राटदार तसेच काही नगरसेवक यांचा समावेश असल्याची ही तक्रारीत नमूद आहे.
निवेदनात मुख्याधिकारी, अभियंता, कंत्राटदार त्यांच्या जवाबदारीची व तलावाच्या कामाच्या प्रतवारीची चौकशी करून त्यांचेवर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर नगराध्यक्ष नौशाद तडवी, नगरसेवक मनोहर सोनवणे, रजीयाबी गुलाम रसूल, सै. युनुस सै. युसुफ, शे. सईदाबी हारुन , शमशाद बेगम यांच्या सह्या आहेत.