जळगाव प्रतिनिधी । शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाच्या वीज महामंडळाच्या कामात काही नगरसेवकांना रस असून त्यांना यात कमीशन हवे असल्याने याचे काम रखडले असल्याचा गंभीर आरोप आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केला. राष्ट्रीय दलीत पँथरचे शांताराम अहिरे यांनी याबाबत सुरू केलेल्या उपोषणाला भेट दिल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या पदाधिकार्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
याबाबत वृत्त असे की, शिवाजीनगरसह अन्य भागांमधील रहिवाशांसाठी मुख्य रस्ता असणार्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम सध्या वादाच्या भोवर्यात सापडले आहे. हे काम संथ गतीने होत असून यामुळे पलीकडच्या भागात राहत असणार्या सुमारे लाखापेक्षा जास्त नागरिकांची चांगलीच कुचंबणा होत आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता आणि परिसरातील नागरिकांनी अनेकदा पाठपुरावा करून देखील कामाची गती वाढलेली नाही. यातच येथून जाणार्या विजेच्या तारांसह काही वीज जोडण्यांच्या हस्तांतरणाचे काम नेमके कोण करणार ? यावरूनही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हे काम महापालिकेने करावे की सार्वजनीक बांधकाम खात्याने ? याचा गोंधळ देखील मिटलेला नाही. या पार्श्वभूमिवर, शिवाजीनगर उड्डाण पुल लवकरात लवकर व्हावा या मागणीसाठी शांताराम अहिरे यांनी उपोषण सुरू केले असून आज त्यांची माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भेट घेतली.
याप्रसंगी एकनाथराव खडसे यांनी थेट महापालिका पदाधिकार्यांवर आरोप केले. ते म्हणाले की, विजेच्या कामात काही पदाधिकार्यांना कमिशन हवे आहे. त्यांचा यात व्हेस्टेड इंटरेस्ट आहे. यामुळेच हे काम रखडले असून पलीकडच्या भागात राहणार्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटदाराला या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत काम पूर्ण करावे लागणार आहे. याआधी विजेच्या स्थलांतरासाठी २०१९ साली ६० लाख रूपयांचा खर्च होता. मात्र महापालिकेने तेव्हा पैसे भरले नाहीत. आता हेच काम दीड कोटी रूपये इतके झालेले आहे. महापालिकेने वीज मंडळाला पैसा न दिल्यामुळे हे काम होऊ शकलेले नाही.
महापालिकेतील काही पदाधिकार्यांना हा ठेका हवा होता. काहींना यात कमीशन हवे होते. तर काहींना याचे मूल्य वाढवायचे होते. यासाठी हे काम टाळण्यात आले. आता हे काम पूर्ण करण्यासाठी अजून पाच-सहा महिने लागणार आहे. महापालिकेतील काही नगरसेवकांचे यात हितसंबंध असल्याचा थेट आरोप नाथाभाऊंनी केला. यातील जे नगरसेवक असतील त्यांची नावे समोर येतील असे प्रतिपादन देखील खडसे यांनी केले. दरम्यान, या प्रकरणी आपण आयुक्त आणि पीडब्ल्यूडीच्या अधिक्षक अभियंत्यांशी बोललो असून त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे शांताराम अहिरे यांनी नाथाभाऊ यांच्या उपस्थितीत आपले उपोषण सोडले.