कोरोनाबाधित महिलेचे घर फोडणार्‍या चोरट्यास अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । कोरोना बाधित असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेचे घर चोरट्यांनी फोडीत त्याठिकाणाहून १ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ३ एप्रिल रोजी अमळनेर शहरात घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडी करणार्‍या एका संशयित आरोपीला अटक केली आहे.

शेख रफिक उर्फ काजल शेख रशिद (वय ३८) रा. जुना सिव्हील हॉस्पिटल असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हकीकत अशी की, अमळनेर शहरातील आर.के. पटेल कंपनीसमोरील जितू वॉशिंग सेंटरच्यावर राहणार्‍या महिलेला कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते. बंद घर असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करीत त्याठिकाणाहून १ लाख ९२ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकीकडे रुग्णाची प्रकृती चिंताजनक होती त्यातच त्या महिलेच्या घरात घरफोडी झाल्याने पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सचिन गोरे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना केल्या होत्या. 

 

त्यानुसार स्थानिक गुन्हे शोखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी तात्काळ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अश्रफ शेख, प्रवीण मांडोळे, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रितम पाटील, दीपक शिंदे, परेश महाजन, इद्रिस पठाण, अशोक पाटील, मुरलीधर बारी, सविता परदेशी, अभिलाषा मनोरे यांचे पथक तपासासाठी रवाना केले.

 

ही घरफोडी अमळनेरमधील जूना सिव्हील हॉस्पिटल जवळील बॉम्बे गल्लीतील शेख रफिक उर्फ काजल शेख शरिद याने केल्याचे समजताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला खाक्या दाखविता त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याने चोरी केलेल्या साहित्यापैकी ३८ हजार ५०० रुपये रोख व १४ हजार ४१० रुपये किंमतीचे सोने असा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. त्याला पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Protected Content