जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात नवीन २६१ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असले तरी यातील एक सकारात्मक पैलू म्हणजे आजवर कोरोनावर विजय मिळवणार्या रूग्णांची संख्या चार हजारांच्या पार गेली आहे. यामुळे कोरोना विरूध्दच्या लढाईत यश मिळणार असल्याचा आत्मविश्वास बळावला आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण २६१ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ८४ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल जळगाव ग्रामीण २८ रूग्ण आढळून आले आहेत. म्हणजे जळगाव तालुक्यात तब्बल १२२ रूग्ण आढळले आहेत. याच्या खालोखाल चोपडा-४०; मुक्ताईनगर-२४; भुसावळ-१४ रूग्ण आढळून आले आहेत.
अन्य ठिकाणांचा विचार केला असता जळगाव ग्रामीण-५; अमळनेर-९; पाचोरा-३; भडगाव-५; धरणगाव-१६; यावल-११; एरंडोल-२; जामनेर-११; रावेर-१९; पारोळा-२; चाळीसगाव-९; बोदवड-१ आणि इतर जिल्ह्यातील-६ अशी कोरोना बाधीतांची संख्या आहे.
दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ६६५४ इतका झालेला आहे. यातील ४००८ रूग्ण बरे झाले आहेत. आजच १२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील रूग्ण वाढीचा आकडा वाढत असल्याचे यातून स्पष्टपणे अधोरेखीत झाले आहे. आज ९ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ३५२ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.
जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढत असल्याने बाधीतांची संख्या देखील वाढत असली तरी बरे होणार्यांचे प्रमाण हे लक्षणीय आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, इन्सीडंट कमांडर गोरक्ष गाडीलकर, आयुक्त सतीश कुलकर्णी आणि जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने कोरोना विरूध्द चांगल्या उपाययोजना केल्यामुळे या युध्दात आता आपण विजय मिळवणार असल्याचा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.