नवी दिल्ली । पुढील वर्षाच्या प्रारंभी कोरोनाची लस येणार असल्याची महत्वाची घोषणा आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली. राज्यसभेत बोलतांना त्यांनी कोरोनाच्या प्रतिकारासाठी मोदी सरकारने केलेल्या उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली.
आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज राज्यसभेत कोरोना विषाणूवरील सरकारच्या प्रत्येक उपाययोजनांची माहिती दिली. आरोग्यमंत्र्यांनी पुढील वर्षाच्या सुरूवातीस भारताला ही लस मिळण्याची ग्वाही दिली. डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून राज्य व केंद्र सरकार कोरोनाविरूद्ध लढा देत आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात संपूर्ण देश कोरोनाची लढाई लढत आहे.
डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यसभेत सांगितले की, जुलै-ऑगस्टमध्ये भारतात ३०० दशलक्ष कोरोना प्रकरणे आणि ५-६ दशलक्ष मृत्यूची नोंद झाली आहे. १३५ कोटींच्या या देशात आपण दररोज ११ लाख चाचण्या घेत आहोत. अमेरिकेने आतापर्यंत ५० दशलक्षांहून अधिक चाचण्या केल्या आहेत. आम्ही चाचणीच्या बाबतीत लवकरच अमेरिकेला मागे टाकू असे ते म्हणाले.
दरम्यान, ते पुढे म्हणाले की, ७ जानेवारी रोजी डब्ल्यूएचओला चीनमध्ये कोरोना प्रकरण सापडल्याची बातमी आली. याची तातडीने दखल घेत, कोरोना प्रकरणात सरकारने अजिबात उशीर केला नाही. आम्ही ८ जानेवारीपासून बैठका सुरू केल्या. पंतप्रधान मोदींनी कोरोनासंदर्भातील प्रत्येक कृतीवर सलग ८ महिने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी भारत इतर देशांप्रमाणे प्रयत्न करीत आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञांचा एक गट यावर देखरेख ठेवत आहे आणि आमच्याकडे यापुढील चांगल्या योजना आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या काळात ही लस भारतात उपलब्ध होईल अशी आमची अपेक्षा आहे. देशभरात साथीच्या आजारामुळे मृत्यूची संख्या कमी झाली आहे आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेली पावले यशस्वी झाली आहेत. कोरोनामुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, आसाम, केरळ, पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, ओडिशा आणि गुजरातमध्ये जास्त मृत्यू झाले आहेत. तथापि, सरकारच्या प्रयत्नांमुळे कोरोनाचा संसर्ग थोपवून धरण्यात यश मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला.