जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 45 हजार 940 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 6 लाख 73 हजार 776 जणांना पहिला डोस तर 1 लाख 72 हजार 164 जणांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.
जिल्ह्यात 16 जानेवारी, 2021 रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी गर्दी करीत आहे.
कोरोना लसीकरणास नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांचे सहज व सुलभ लसीकरण व्हावे याकरीता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 73 हजार 776 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 1 लाख 72 हजार 164 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 8 लाख 45 हजार 940 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 4 लाख 59 हजार 507 तर ग्रामीण भागातील 3 लाख 86 हजार 433 नागरीकांचा समावेश आहे. नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज सकाळी ११ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात केले आहे.