चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील ग्रामीण भागातील ऊसतोडणी कामगार हे मोठ्या संख्येने गावी परतू लागले आहेत. कोरोना चाचणी न करता गावात शिरकाव करत असल्याने रूग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्यामुळे गावात प्रवेश करण्यासाठी कामगारांना कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह सोबत बाळगणे अनिवार्य असल्याचे आवाहन गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केले आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली जात असताना याउलट तालुक्यातील ग्रामीण भागात अचानक रूग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. ऊसतोडणी कामगार हे आपापल्या गावी मोठ्या संख्येने परतू लागले आहेत. त्यात कोरोनाची चाचणी न करताच आपल्या गावी परतल्याने रूग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्यामुळे रूग्णांची संखा आटोक्यात आणण्यासाठी गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी कठोर नियम लागू केले आहेत. कामगारांना आता गावात शिरकाव करण्यापूर्वी कोरोनाची निगेटिव्ह चाचणी सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आले आहेत. दि. ६ जून रोजी तालुक्यातील विविध भागात कोव्हिड चाचणीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात खेरडे व हातले या ठिकाणी कोरोनाचा विस्फोट पहायला मिळाला. हि गंभीर स्वरूपाची बाब लक्षात घेऊन गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी वरील नियम लागू केले आहे. त्याचबरोबर कोरोना विषयक काहीही माहिती असेल तर गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, विस्तार अधिकारी माळी, विस्तार अधिकारी आर. आर. पाटील व ग्रामविस्तार अधिकारी शेरके आदींना कळविण्याचे आवाहन गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केले आहे.