देशात कोरोना रूग्णसंख्येचा स्फोट: २४ तासांमध्ये २७ टक्के नवीन रूग्ण !

नवी दिल्ली | देशभरातील कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून चोवीस तासांमध्येच तब्बल २७ टक्के रूग्ण संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ४७ हजार ४१७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आधीच्या दिवशीच्या तुलनेत ही रुग्णसंख्या २७ टक्के अधिक आहे. गेल्या काही दिवसांतील ही उच्चांकी रुग्णसंख्या आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत ८४,८२५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात ११ लाख १७ हजार ५३१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट १३.११ टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी १५.०८ टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. मंगळवारी आढळलेल्या १ लाख ६८ हजार ६३ कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत बुधवारी १ लाख ९४ हजार ७२० कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ४४२ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९६.०१ टक्के नोंदवण्यात आला होता.

दरम्यान, देशातील कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीनंतर कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांच्या डिस्चार्ज धोरणात बदल करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी काल पत्रकार परिषदेतून दिली होती.

कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या संसर्गग्रस्तांना अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून सात दिवसांनी डिस्जार्च केले जावू शकते. दरम्यान, सातत्याने तीन दिवसांपर्यंत रूग्णांची प्रकृती सुधारली आणि त्याला ताप आला नाही तर डिस्चार्ज करतांना त्यांची कोरोना तपासणी करण्याची आवश्यकता राहणार नाही. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन बर्‍याच वेगाने पसरत आहे. दक्षिण आफ्रिका, ब्रिटेन, कॅनडा तसेच डेनमार्क मध्ये आढळलेल्या डेल्टा व्हेरियंटनुसार ओमायक्रॉन मुळे रूग्णालयात भरती होण्याचा धोका डेल्टाच्या तुलनेत बरीच कमी आहे, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली आहे.

 

 

 

 

 

 

Protected Content