नागपूर प्रतिनिधी । कोरोना सोबत म्युकर मायकोसीसच्या धोक्यामुळे लोक धास्तावले असतांना आता वर्धा येथे या व्याधीवर उपयुक्त ठरणार्या इंजेक्शनचे उत्पादन होणार असून याचे मूल्य बाराशे रूपये राहणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
कोरोनाच्या उपचार घेतलेल्या रूग्णांना म्युकर मायकोसीस हा बुरशीजन्य आजार होत असल्याचे अलीकडच्या काळात दिसून आले आहे. यामुळे अनेक रूग्णांचे डोळे, कान आदी अवयव पूर्णपणे खराब झाले असून बर्याच जणांचा यात प्राण देखील गेलेला आहे. सध्या याचे उपचार खूप महागडे असल्याने सर्वसामान्यांना अडचणी येत आहेत. मात्र केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने आता वर्धा येथे यावर उपयुक्त ठरणार्या इंजेक्शनचे उत्पादन होणार आहे.
वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनी म्युकर मायकोसिसवरील एम्फोटेरीसीन बी इंजेक्शन तयार करणार आहे. या कंपनीला राज्याच्या एफडीएनं परवानगी दिली आहे. पुढील १५ दिवसांत कंपनी इंजेक्शनचं उत्पादन सुरू करेल.
नितीन गडकरींच्या कार्यालयानं म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनच्या निर्मितीबद्दल ट्विटरवरून माहिती दिली आहे. ‘एम्फोटेरीसीन बीचं एक इंजेक्शन ७ हजार रुपयांना मिळतं. एका रुग्णाला ४० ते ५० इंजेक्शन्स दिली जात आहेत. त्यामुळे लोकांना ही इंजेक्शन्स सहज उपलब्ध होत नाहीत. वर्ध्यात तयार होणारं इंजेक्शन १२०० रुपयांत मिळेल. एका दिवसात २० हजार इंजेक्शनची निर्मिती करण्यात येईल,’ अशी माहिती गडकरींच्या कार्यालयानं ट्विटरवरून दिली आहे.