जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर व तालुका तसेच चोपडा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढीस लागल्याचे आजच्या रिपोर्टमधून दिसून आले आहे. आज जिल्ह्यात एकूण २६८ पॉझिटीव्ह आढळले असून उपचार सुरू असणारे दहा रूग्ण दगावले आहेत.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण २६८ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ७८ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल चोपडा तालुक्यात ४२ रूग्ण आढळून आले आहेत.
अन्य ठिकाणांचा विचार केला असता जळगाव ग्रामीण-२२; भुसावळ-२०; अमळनेर-८; पाचोरा-७;भडगाव-१९; धरणगाव-७; यावल-८; जामनेर-८; रावेर-१५; पारोळा-२; चाळीसगाव-२३; मुक्ताईनगर-६; बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील-१ अशी कोरोना बाधीतांची संख्या आहे. आज एरंडोल तालुक्यात कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही हे विशेष.
दरम्यान, आजच्या बाधितांची संख्या मिळवली असता आजवर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ९४५१ इतका झालेला आहे. यातील ६०४३ रूग्ण बरे झाले आहेत. आजच २०९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज १० मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ४६० इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे. जळगाव शहर आणि तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे सातत्याने दिसून येत आहे. तर मध्यंतरी थोडा संसर्ग कमी झालेल्या चोपडा तालुक्यातही आता कोरोना बाधीत वाढत चालले आहेत.