जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून भुसावळातील एका रूग्णांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
कोरोनाचा नवीन व्हेरियंट हे देशाच्या कान्याकोपर्यात वेगाने पसरत असल्याची माहिती समोर आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ठिकठिकाणी चाचण्यांना वेग आलेला आहे. या अनुषंगाने घेण्यात आलेल्या चाचण्यांमधून भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे या गावातील ४३ वर्षाचा रूग्ण हा कोरोनाने बाधीत आढळून आला असून याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.
काही दिवसांपूर्वी या रूग्णाची चाचणी घेण्यात आली होती. त्याप्रसंगी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सध्या रूग्ण अगदी ठणठणीत बरा झालेला असून त्याला डिसचार्ज देण्यात आल्याची माहिती देखील जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
संबंधीत रूग्णाची प्रकृती ही धोक्याबाहेर असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कोरोनाचा नवीन व्हेरियंट वेगाने पसरत असला तरी तो आधी इतका धोकेदायक नसल्याची माहिती तज्ज्ञांनी आधीच दिलेली आहे. तथापि, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.