डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालयात दीक्षांत सोहळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “डॉक्टर होणं म्हणजे पैसे देणारे झाड गवसले असे समजणे चुकीचे आहे, वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून ती माणुसकी जपणारी सेवा असली पाहिजे,” असे स्पष्ट मत गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील यांनी मांडले. त्या डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित सन २०१९ बॅचच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

हा समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्वीकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश मिश्रा, डॉ. पंकज शर्मा, डॉ. आरती शिलाहार आदी मान्यवर उपस्थित होते. समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग घेत विद्यार्थ्यांना आणि पालकांना शुभेच्छा दिल्या.

डॉ. केतकीताई पाटील यांनी आपल्या भाषणात सन २०१९ बॅचच्या विशेष वाटचालीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर ताण होता. मात्र त्यांच्या संयम, धैर्य आणि संस्थेवरील विश्वासामुळेच हा दिवस अनुभवता आला.”

पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “आज तुम्ही डॉक्टर झाले आहात, मात्र ही केवळ सुरुवात आहे. संशोधनासाठी नेहमी सज्ज राहा. शहरी भागात अनुभव घ्या पण तुमच्या मुळाशी असलेल्या ग्रामीण भागात सेवा द्यायला विसरू नका. खरे डॉक्टर तेच जे माणुसकी जपतात.”

या दीक्षांत समारंभात ५३ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. अनेक पालक आपल्या पाल्याच्या यशाने भावविवश झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पाटील व दीपेश सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. पंकज शर्मा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजीव जामोदकर, ललित महाजन यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Protected Content