मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वीच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन खटके उडताना दिसत आहे. विधान परिषदेच्या दोन पदवीधर तसेच दोन शिक्षक अशा चार मतदार संघासाठी 26 जूनला मतदान होणार आहे. यासाठी महायुतीच्या जवळपास सर्व पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी दर्शवली आहे.
अगदी मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे अनिल परब उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर याच जागेसाठी राज ठाकरेंचा मनसे पक्षाकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता यात भर पडली आहे ती भाजप आणि शिंदे गटाची. शिवसेना शिंदे गटाकडून या जागेवर माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दावा केला आहे. भाजपासुद्धा या जागेवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटही आपला उमेदवार उभा करणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. आता वेळच सांगेल की या महायुतीमध्ये एकी होते की हे एकमेकांसमोर उभे ठाकतात. विधान परिषदेच्या चार जागांसाठी 26 जूनला सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान असणार आहे. तर 1 जुलैला मतमोजणी होणार असून निकाल लागणार आहे.