मुंबई (वृत्तसंस्था) महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांना हे ट्विट भोवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चौधरींवर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची तात्काळ दखल घेऊन चौधरी यांची महापालिकेतून मंत्रालयात उचलबांगडी केली आहे.तसेच त्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली आहे.
निधी चौधरी यांनी 17 मे रोजी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले होते. त्यात त्यांनी महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीचे निमित्त साधून त्यांचे नोटेवरील फोटो आणि जगभरातील पुतळे हटविण्याची मागणी करणारे ट्विट केले होते. तसेच महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेचे आभारही मानले होते. त्यामुळे वादंग निर्माण होताच चौधरी यांनी ते ट्विट डिलीट करत ते केवळ उपरोधिक ट्विट होते, असे स्पष्टीकरण दिले होते. निधी चौधरी या आयएएस 2012 बॅचच्या अधिकारी असून मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (विशेष) म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्या सहाय्यक कलेक्टर होत्या.