नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बनावट प्रमानपत्र सादर करून आयएसएस झालेल्या पूजा खेडकर यांना आता यूपीएससी नंतर केंद्र सरकारने मोठा दणका दिला आहे. सुरुवातीला केंद्रीय लोकसेवा आयोगाने आयएएस प्रोबेशनर पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची तात्पुरती उमेदवारी रद्द केली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने पूजा खेडकरची भारतीय प्रशासकीय सेवेतून (आयएएस) हकालपट्टी केली आहे.
केंद्र सरकारने आयएएस (प्रोबेशन) नियम, १९५४ च्या नियम १२ अंतर्गत पूजा खेडकरला भारतीय प्रशासकीय सेवेतून ताबडतोब कार्यमुक्त केलं आहे. फसवणूक आणि ओबीसी आणि अपंगत्व कोट्याच्या फायद्यांचा खोटी कागदपत्र सादर करून गैरवापर केल्याच्या आरोपांना तोंड देत, यूपीएससीने खेडकर यांची तात्पुरती उमेदवारी रद्द केली. दरम्यान, यापूर्वी, केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला देखील विरोध केला होता आणि म्हटले की तिने केवळ आयोगाचीच नव्हे तर जनतेचीही फसवणूक केली. कारण पूजा खेडकर या नागरी सेवा परीक्षांना (सीएसई) बसण्यास अपात्र आहे.
यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२२ च्या अर्जात आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी चुकीची माहिती दिल्याचा आरोप झाल्यानंतर खेडकर यांच्या कायदेशीर अडचणींना सुरुवात झाली. यूपीएससी आणि दिल्ली पोलिसांनी तिच्यावर २०२२ आणि २०२३ च्या परीक्षेसाठी दोन वेगवेगळ्या कागदपत्रांसह बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप केला आहे. ३१ जुलै रोजी खेडकर यांची उमेदवारी रद्द करणाऱ्या यूपीएससीने यापूर्वी म्हटले होते की, त्यांनी आयोग आणि जनतेविरोधात फसवणूक केली आहे आणि या कटाची संपूर्ण व्याप्ती उघड करण्यासाठी त्यांची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे.