Home उद्योग सरकारी कार्यालयात ठेकेदाराचा वाढदिवस ; महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यावर शिस्तभंग कार्यवाहीची मागणी तीव्र

सरकारी कार्यालयात ठेकेदाराचा वाढदिवस ; महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यावर शिस्तभंग कार्यवाहीची मागणी तीव्र


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील महावितरण विभागीय कार्यालयात शासकीय नियमांना धाब्यावर बसवून ठेकेदाराचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. संबंधित कार्यक्रम कार्यकारी अभियंता चव्हाण यांच्या दालनात पार पडल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 अंतर्गत शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

सरकारने वेळोवेळी परिपत्रके काढून कार्यालयीन वेळेत वाढदिवस, सण किंवा तत्सम कार्यक्रम सरकारी कार्यालयात न साजरे करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. असे असतानाही माऊली इन्फ्रास्ट्रक्चर या खासगी कंपनीच्या ठेकेदाराचा वाढदिवस कार्यकारी अभियंता चव्हाण यांच्या कार्यालयातच साजरा करण्यात आला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दबावाखाली जबरदस्तीने या कार्यक्रमात सहभाग घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

कार्यक्रमादरम्यान फोटोज आणि शुभेच्छा यांचा वर्षाव करण्यात आला. ठेकेदाराने हा फोटो स्वतःच्या सोशल मीडिया स्टेटसवरही प्रदर्शित करत आपली प्रशासनातील घनिष्ट संबंध आणि “ताकद” दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. यामुळे सामान्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीमुळे कोणीही स्पष्टपणे विरोध दर्शवू शकले नाही.

या प्रकारामुळे महावितरण विभागाची प्रतिमा मलीन झाली असून, सरकारी कार्यालय हे खासगी स्नेहसंमेलनाचे व्यासपीठ नाही, हे पाळण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच असते. सरकारी कार्यालयांमध्ये अशा गोष्टींना परवानगी नसताना नियम धाब्यावर बसवून साजरा झालेला हा वाढदिवस, शिस्त आणि जबाबदारी यांना हरताळ फासणारा ठरत आहे.

नागरिक आणि काही सामाजिक संघटनांकडून याबाबत तक्रार दाखल होण्याच्या हालचाली सुरू असून, संबंधित कार्यकारी अभियंत्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ शिस्तभंगाची कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. प्रशासन जर अशा प्रकाराकडे दुर्लक्ष करत असेल, तर यापुढेही अशा घटनांना चालना मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound