यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगर कठोरा येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील वार्ड क्रमांक ४ मध्ये गेल्या काही दिवसांपासुन ग्रामस्थांना अत्यंत दुर्गंधीयुक्त दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने लोकप्रतिनिधीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे वार्ड ४ मधील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असुन संत्पत प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
या संदर्भात मिळालेले वृत असे की, डोंगर कठोरा येथील ग्राम पंचायतीच्या वतीने वार्ड क्रमांक ४ मध्ये दि.२ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आलेला पाणीपुरवठा हा अत्यंत दुर्गंधीयुक्त असल्याचे वार्ड वासियांच्या लक्षात आल्याने त्याच वेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्यांकडे आपली समस्या मांडली असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. यावेळी निधी उपलब्ध झाल्यावर बघु, असे उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. विशेष म्हणजे सरपंच सुमनबाई वाघ या ज्या वार्डातुन निवडुन आल्या आहेत, त्याच वार्डात दुषीत पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांकडुन अधिक संताप व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने अशा प्रकारचा दुषीत पाणी ग्रामस्थांना मिळत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्राम पंचायत प्रशासनाने तत्काळ लक्ष देवुन ही समस्या सोडवावी. अशी मागणी करण्यात येत आहे.