जळगाव, प्रतिनिधी | जलशक्ती अभियानातंर्गत डीपीडीसीकडून जिल्हा परिषदेला १८ कोटी रूपयांची कामे मंजुर असतांना हा विषय परस्पर मंजुर केल्यामुळे त्यांच्या प्रशासकिय मान्यता थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर उर्वरीत ८ कोटींची कामे ही रावेर आणि यावल तालुक्यातच देण्यात आले होते, मात्र प्रशासकिय मान्यता थांबविण्यात आलेली कामे लघुसिंचन विभागाने परस्पर सुरू केल्याने कार्यकारी अभियंता आर. के. नाईक यांनी जिल्हाधिकारी यांची देखील दिशाभूल केल्याचा आरोप स्थायी सभेत सदस्यांकडून करण्यात आला.
आज जि. प. अध्यक्षा उज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सीईओ वान्मती सी., प्रभारी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, रजनी चव्हाण, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.सभेत लघुसिंचन विभागाने जलशक्ती अभियानातंर्गत मंजूर कामात जिल्हाधिकारी यांची दिशाभूल केल्याचा आरोप करत कार्यकारी अभियंता यांनी रावेर आणि यावल येथे कामांना परस्पर सुरवात केल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. याविषयी नाईक यांच्या कार्यमुक्त करण्याच्या ठरावावर कोणती कारवाई झाली? याची विचारणा करण्यात आली. याबाबत सदस्यांचा रोष बघून सीईओ वान्मती सी. यांनी जातीने लक्ष देऊन जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या जळगाव उपविभागीय कार्यालयातील उपअभियंता श्री. काकडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या महिनाभरापासून काकडे यांनी कोणत्याही फाईलवर सही केलेली नसून ते कार्यालयात वेळेवर येत नसल्याने फाईली पडून होत्या. यामुळे त्यांच्यावर पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा देखील रोष असल्याने तक्रारनुसार सभेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव करताच सीईओ वान्मती यांनी काकडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश काढले. ग्रामपंचायत विभागातील पदोन्नतीत १० टक्के पदोन्नती ग्रामपंचायत विभागातील चतुर्थ कर्मचाऱ्यांमधून दिली जाते. यात दोन महिन्यांपुर्वी २७ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र ही पदोन्नती चुकीची असल्याची तक्रार आली होती. याबाबत सभेत चर्चा झाल्यानंतर त्यात घोळ झाला असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणदीवे यांनी सांगितले. तसेच ग्रामसेवक व ग्रामविस्कार अधिकारी यांच्या पदोन्नतीचे काम पंधरा दिवसात करण्याचे ठरविण्यात आले. चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथील ग्रामसेवकांना त्यांच्याकडे कामानिमित्त आलेल्या गावातील जेष्ठ नागरिक सुरेश शेटे यांना ग्रामपंचायत कार्यालयात शिवीगाळ करून बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित ग्रामसेवकावर त्वरीत कारवाई करण्याबाबचा मुद्दा अर्थ, शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे यांनी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला. तसेच हा विषय उद्या होणार्या सर्वसाधारण सभेत पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. तसेच चाळीसगाव तालुक्यातील रोकडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मनमानी करीत असून गावाचे सरपंच व उपसरपंच यांना विश्वासात न घेता काम करीत असल्याची तक्रार सभापती भोळे यांनी केली आहे. त्याअनुषंगाने या दोन्ही ग्रामसेवकांची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा मुद्दा सभापती भोळे यांनी उपस्थित केला.